Mon, Jul 06, 2020 10:24होमपेज › Goa › एकमेकांशी प्रेमाने वागा

एकमेकांशी प्रेमाने वागा

Last Updated: Dec 05 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी 

प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने वागावे. कधीही दुसर्‍याचा द्वेष करु नये. जगात प्रेम पसरावे, असा संदेश जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर अर्थात गोंयच्या सायबाच्या फेस्तानिमित बासिलिका ऑफ बॉम जीझस चर्चच्या प्रांगणात आयोजित प्रमुख प्रार्थनेच्यावेळी मंगळूरचे बिशप पीटर पॉल साल्ढाणा यांनी मंगळवारी उपस्थित भाविकांना दिला.

जुने गोवे येथील गोंयच्या सायबाचे फेस्त लाखो भाविकांच्या हजेरीत मंगळवारी पार पडले. प्रमुख प्रार्थनेला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. या प्रमुख प्रार्थना सभेला गोव्याचे आर्च बिशप फिलीप नेरी फेर्रांव, पोर्ट ब्लेअर येथील फादर आलेक्स डायस, रांचीचे फादर तिओतर डायस व अन्य व्यासपीठावर हजर होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, घनकचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे, लुईझिन फालेरो, टोनी फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, चर्चिल आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आदी प्रार्थना सभेला हजर होते. 

मंगळूरचे बिशप पीटर पॉल साल्ढाणा म्हणाले, जेजूं ख्रिस्ताने सर्वांना प्रेमाने वागायचा संदेश दिला आहे. तो प्रत्येकाने पाळावा. एकमेकांशी वागताना प्रेमभावना कायम ठेवावी. एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी जगात प्रेम पसरावे. वाईट कर्म कधीही करु नये, नेहमी चांगले कर्मच करावे. भावार्थाने तसेच सद्भावनेने काम करणार्‍यांनाच देव भेटतो, असे त्यांनी सांगितले.

देव तिथेच असतो जिथे प्रेम असते. जिथे प्रेम नाही तेथे देव नाही. जेजूंने आम्हाला शांती, प्रेम आणि समृद्धीचा संदेश दिला आहे. समाजात हा संदेश पोचवावा. प्रत्येकाने एकमेकांशी बांधीलकी राखून जेजू ख्रिस्तांचा संदेश पाळावा. प्रत्येकाने देवाला मानावे. समाजासाठी चांगले काम करावे, कुणावरही अन्याय करु नये, असेही बिशप पीटर पॉल साल्ढाणा यांनी सांगितले. 

या प्रमुख प्रार्थनेसाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. यावेळी गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील भाविकांचा समावेश होता. यापैकी अनेक भाविक हे पायी येतात. जुने गोवे फेस्त हे केवळ गोवा तसेच शेजारील राज्यांतच नव्हे तर विदेशातदेखील बरेच प्रसिद्ध आहे. अनेक विदेशी पर्यटक खास या फेस्ताला हजेरी लावतात. यंदादेखील अनेक देशी तसेच विदेशी पर्यटकांनी आवर्जून या फेस्ताला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 

या फेस्तानिमित सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्च परिसरात मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. त्याचबरोबर परिसरावर नजर ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारण्यात आले होते. त्यावरुन दुर्बिणीच्या सहाय्याने पोलिसांकडून देखरेख ठेवली जात होती. फेस्ताच्या पार्श्वभूमीवर चर्च परिसरात फेरी भरवण्यात आली असून यात चणे, खारे शेंगदाणे, खाजे, लाडू, लहान-मोठ्यांचे कपडे, भांडी, कॉस्मेटीक, खेळणी, पडदे, चादरी, चप्पल, घर सजावटीचे साहित्य, फुले, गोबी मंच्युरीयन, लिंबू सरबत आदीची दुकाने थाटण्यात आली आहेत. याशिवाय मुलांसाठी जायंट व्हील, टॉय ट्रेनदेखील आहेत. फेरीत खरेदी करण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे दिसून आले. साधारणतः 10 डिसेंबरपर्यंत ही फेरी असेल.