होमपेज › Goa › सोनसड्याचे काम फोमेंतो थांबवणार

सोनसड्याचे काम फोमेंतो थांबवणार

Published On: Jun 05 2019 1:28AM | Last Updated: Jun 05 2019 1:28AM
पणजी : प्रतिनिधी

फातोर्डा येथील सोनसडा कचरा प्रकल्पाची 2011 सालापासून देखभाल करणार्‍या फोमेंतो कंपनीने आपले काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या 3-4 महिन्यांत या कचरा यार्डाची जबाबदारी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. 

पर्वरी येथील मंत्रालयात मंगळवारी सोनसडा कचरा यार्डाला लागलेल्या आगीसंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दुसर्‍यांदा उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री सरदेसाई, मडगावच्या नगराध्यक्ष डॉ. बबिता आंगले प्रभूदेसाई, मडगाव पालिकेचे अधिकारी तसेच अन्य सरकारी अधिकार्‍यांचा समावेश होता. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सरदेसाई म्हणाले की, फोमेंतो कंपनीने मडगाव पालिका मंडळाला पाठवलेल्या पत्रात सोनसडा प्रकल्पाची जबाबदारी सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सरकारने या कंपनीला काम थांबवण्यास सांगितले नसून त्यांनी स्वत:हून सोनसडा प्रकल्प सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून सोनसडा यार्डाची समस्या सोडवण्याबाबत नव्याने उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. 

‘सोनसडा’वर कायमचा तोडगा काढणार : सरदेसाई

सोनसडा कचरा यार्डाच्या परिसरातील राहिवाशांच्या समस्येबाबत राज्य सरकार तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आपण जागरूक आहे. सोनसडा समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत असले तरी स्थानिकांकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे. सोनसडा यार्डातील प्रदूषणामुळे स्थानिकांना सरकार आणखी त्रास देऊ इच्छित नाही. स्थानिकांना आतापर्यंत जो त्रास सहन करावा लागला आहे, त्याबद्दल आपण दिलगीर असल्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.