Fri, Jul 10, 2020 00:25होमपेज › Goa › ...तर केवळ फातोर्ड्याचाच विचार 

...तर केवळ फातोर्ड्याचाच विचार 

Published On: Jun 26 2019 1:38AM | Last Updated: Jun 27 2019 1:33AM
मडगाव : प्रतिनिधी

आग आणि कचरा तुंबण्याच्या घटनेमुळे गेले वीस दिवस चर्चेत असलेल्या सोनसड्याच्या विषयावरून कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड विरुद्ध उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई असा वाद निर्माण झाला आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोनसड्याच्या स्थितीला विजय सरदेसाई यांना जबाबदार धरल्याने आता विजय सरदेसाई यांनीही दंड थोपटले असून आपल्यावर नाहक आरोप करू नका, भविष्यात फोमेंतोने सोनसड्याचा ताबा सोडल्यास आपल्याला केवळ फातोर्डा मतदारसंघापुरताच विचार करावा लागेल, असा थेट इशारा त्यांनी रेजिनाल्ड यांना दिला आहे.

येथील रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमानंतर सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सोनसड्याच्या यार्डात कोणाचा कचरा येतो, हे आपल्याला माहिती आहे. आपण मतदारसंघामध्ये भेदभाव केलेला नाही, पण फोमेंतोने सोनसड्याच्या कामांतून आपले अंग काढून घेतल्यास आपल्याला सर्वात आधी आपल्या मतदारसंघाचा विचार करावा लागेल. कचर्‍याच्या विषयावर सर्वांनी एकत्रितपणे विचार करून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. सोनसड्याविषयी पुढील कृती पारदर्शक असेल; त्यासाठी लोकप्रतिनिधी, पालिका, सरकार आणि जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. पण त्यासाठी फोमेंतोशी असलेल्या कराराचा विषय लवकरात लवकर संपुष्टात येणे गरजेचे आहे, असेही सरदेसाई म्हणाले. 

सध्या लोकांनी दुसर्‍या भागातील कचरा आपल्या भागात घेणार नाही, असे धोरण अवलंबणे सुरू केले आहे. कुडतरीच्या लोकांनी वर्गीकृत कचरा न आल्यास सोनसड्यावर कचरा येऊ देणार नाही, 
अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करतोे. पण सोनसडा सध्या फातोर्ड्यात आहे. त्यातील कचरा नेमका कोणाचा आहे हे कोण ठरवणार, असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. 2011 साली फोमेंतोला सोनसड्यावर आणणारे काँग्रेसचे आमदार तथा तत्कालिन मुख्यमंत्री दिगंबर कामत होते. आपण त्यावेळी आमदारही नव्हतो. फातोर्डा मतदारसंघात त्यावेळी दामू नाईक आमदार होते. कुडतरीत आलेक्स रेजिनाल्ड आमदार होते. हे सर्व त्यांनीच घडवलेले आहे, असेही सरदेसाई म्हणाले. आपण कोणावर टीका करत नाही, विरोधात असतानाही आपण कोणाला त्रास दिला नाही, पण आता सोनसड्याच्या विषयामुळे फातोर्डा मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्याला त्रास होऊ लागला आहे.त्यासाठी फोमेंतोने सोनसड्याच्या विषयावरून आपले अंग काढून घेतल्यास आपल्याला आमदार या नात्याने फातोर्डा मतदारसंघाचाच विचार करावा लागेल. केवळ फातोर्डा मतदारसंघाच्या कचर्‍याचा विषय कसा नियंत्रणात आणता येईल, यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल, असे सरदेसाई म्हणाले.

फोमेंतोला सोनसड्यावर स्थान देणारे सध्या मूग गिळून गप्प आहेत.रेजिनाल्ड विनाकारण आपल्यावर टीका करत आहेत. त्यावेळी रेजिनाल्डसुद्धा आमदार होते. त्यांचा काँग्रेस पक्ष त्यावेळी सत्तेत होता. आता या गंभीर परिस्थितीत त्यांचा पक्ष कुठे आहे, असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचाही सोनसडा विषयाशी संबंध येतो. ते या प्रश्नावर गप्प का आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.