Fri, Sep 25, 2020 15:22होमपेज › Goa › दुकाने, सुपरमार्केट्स आजपासून खुली

दुकाने, सुपरमार्केट्स आजपासून खुली

Last Updated: Mar 27 2020 1:30AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील भुसारी दुकाने आणि सुपरमार्केट्सना शुक्रवारपासून व्यवहार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत, केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन राज्य सरकारकडून केले जाणार आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून राज्यात कोरोना व्हायरसचा धोका कायम असल्याने गोमंतकीयांनी ग्रामीण आणि शहरी भागातील दुकानांत एकाचवेळी गर्दी करू नये. लोकांनी मास्क परिधान करून एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावे. आगामी दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून लोकांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी दिवसभरात मंत्रिमंडळातील मंत्री, सरकारी अधिकारी तसेच भुसारी दुकाने आणि सुपरमार्केटच्या मालकांसोबत चर्चा केली. त्यानंतर उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी जनतेकडून आल्या आहेत. लॉकडाऊनचा निर्णय सरकारने आपल्या वैयक्‍तिक स्वार्थासाठी केला नसून जनतेच्या आरोग्याच्या भल्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी केला आहे. याविषयी राज्य सरकारवर आणि खास करून आपल्यावर टीकेचा भडिमार झाला. यामुळे, आपण राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व दुकाने, सुपरमार्केट शुक्रवारपासून खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. ज्या दुकानांना शक्य असेल त्यांना 24 तास व्यवहार खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे.

लोकांनी अजूनही रस्त्यावर येऊ नये, अशी आपली विनंती आहे. काही विघ्नसंतोषी लोकांना जनतेची काळजी नाही. ते फक्‍त सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. ते लोकांना भडकावण्याचे आणि सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचे काम करत आहेत. दुकाने खुली ठेवतानाही केंद्र सरकाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाणार आहे. लोकांनी रस्त्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले. 

 "