होमपेज › Goa › कुर्टीत सतरकर कुटुंबीयांच्या घरात साकारली 450 नगांची माटोळी

कुर्टीत सतरकर कुटुंबीयांच्या घरात साकारली 450 नगांची माटोळी

Published On: Sep 05 2019 1:42AM | Last Updated: Sep 04 2019 11:15PM
फोंडाःप्रतिनिधी
कोपरवाडा - कुर्टीतील सतरकर कुटुंबीयांच्या घरात यावर्षीही आकर्षकरीत्या माटोळी साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा महादेवाच्या स्वरुपातील ही आकर्षक माटोळी गणेश भक्‍त आणि दर्शकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. या माटोळीसाठी साधारण साडेचारशे नगांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

कुर्टी येथील श्रीकांत सतरकर यांच्या घरातील गणेशमूर्तीसमोरील माटोळी दरवर्षी आकर्षकरित्या सजवली जाते. राज्य सरकारच्या माटोळी स्पर्धेतही बर्‍याचदा सतरकर कुटुंबीयांची माटोळी अव्वल ठरली आहे. ही माटोळी साकारण्यासाठी महिनाभर कष्ट घेतले जातात. रानात जाऊन दुर्मीळ अशा फळांसह वनस्पती आणून ही माटोळी सजवण्यात येते. यंदाही सुमारे साडेचारशे नगांची माटोळी साकारण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे महिलांनीही ही माटोळी साकारण्यासाठी परिश्रम घेतल्याचे श्रीकांत सतरकर यांनी  सांगितले. 

माटोळी आकर्षक होण्यासाठी आणि दुमीर्र्ळ फळे व वनस्पती शोधण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. चोर्ला, खानापूर तसेच अन्य ठिकाणच्या रानातून ही दुमीर्र्ळ फळे व वनस्पती मिळतात, मात्र ती शोधून काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. पण जेव्हा माटोळी साकारते तेव्हा एक वेगळेच समाधान लाभते, असे श्रीकांत सतरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगितले.