Thu, Nov 26, 2020 21:03होमपेज › Goa › रतन टाटांनी ठेवले कुत्र्याचे नाव ‘गोवा’

रतन टाटांनी ठेवले कुत्र्याचे नाव ‘गोवा’

Last Updated: Nov 22 2020 2:03AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

टाटा समूहाचे अध्यक्ष, नामवंत उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या कुत्र्याचे नाव ‘गोवा’ असे ठेवले आहे. गोवा हे ‘नाव’ म्हणून आणि तेही ‘कुत्र्याचे नाव’ ठेवण्यामागील कारण ऐकल्यानंतरच कदाचित गोमंतकीयांचा चढलेला पारा शांत होऊ शकेल. ‘गोवा’ हे नाव ठेवण्यामागचे कारण रतन टाटा यांनीच आपल्या इन्स्टाग्रामवरून स्पष्ट केले आहे. 

 रतन टाटा हे काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंगवर सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवरून वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून टाटा यांनी त्यांच्या आठवणींतील फोटो पोस्ट केले आहेत. टाटा विशेषत: त्यांच्या कुत्र्यांवरील प्रेमाबद्दल पोस्ट  शेअर करतात. असाच एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला असून ती पोस्ट पाहून कुणालाही कुतूहल वाटेल. 

रतन टाटा हे मुंबईमधील बॉम्बे हाऊसमध्ये राहतात. त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्ये दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबर काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत. याच कुत्र्यांबरोबरचा एक फोटो रतन टाटा यांनी दिवाळीच्या दिवशी शेअर केला आहे. बॉम्बे हाऊसमधील कुत्र्यांबरोबरचे काही फोटो दिवाळीदरम्यानचे आहेत. यापैकी ‘गोवा’ हा कुत्रा खूप जवळचा असून हा कुत्रा ऑफिसमध्येही आपल्यासोबत असतो, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. दिवाळीत बॉम्बे हाऊसमध्ये दत्तक घेतलेल्या कुत्र्यांसह काही क्षण, विशेषत: ‘गोवा’, माझ्या कार्यालयातील सहकारी’, अशा आशयाची पोस्ट रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.   

रतन टाटा यांंच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत. टाटा हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल सोशल नेटवर्किंग साईटवरुन नेहमीच चाहत्यांना माहिती देत असतात. टाटा हे उद्योगपती असण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यातही अग्रेसर असतात.  कुत्र्याचे नाव ‘गोवा ’ ठेवण्यामागचे कारण ऐकल्यानंतर गोमंतकीयांचा राग नक्कीच शांत झाला असेल.

कारण की... गोवा टू बाँबे

रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर तीन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स असल्यामुळे कुत्र्याचे नाव ‘गोवा’ का ठेवले याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला व ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. रतन टाटा यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर एका चाहत्याने कुत्र्याचे नाव ‘गोवा’ ठेवण्यामागील कारण किंवा किस्सा सांगण्याचा आग्रह धरला. सामान्यपणे सेलिब्रिटी आपल्या फॉलोअर्सना रिप्लाय देत नाहीत. मात्र, रतन टाटा यांनी चाहत्याला रिप्लाय देत कुत्र्याचे नाव ‘गोवा’ ठेवण्यामागील कारण सांगितले आहे. टाटा यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘आपला एक सहकारी गोव्याहून त्याच्या कारने मुंबईला येत असताना रस्त्यावरील एक कुत्र्याचे पिल्लू त्याच्या गाडीत चढले आणि ते थेट बॉम्बे हाऊसपर्यंत आले. त्यामुळेच त्याचे नाव ‘गोवा’ असे ठेवले आहे.’