Wed, Jan 20, 2021 00:06होमपेज › Goa › गोवा राज्यात पावसाची रीपरीप सुरूच; आज,उद्या ऑरेंज अलर्ट 

गोवा राज्यात पावसाची रीपरीप सुरूच; आज,उद्या ऑरेंज अलर्ट 

Last Updated: Jul 15 2020 1:29AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात मागील तीन दिवस पावसाने ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार झाले असून मान्सूनने पुन्हा एकदा राज्याला झोडपण्यास सुरुवात केली आहे. राज्यात विविध ठिकाणी मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम होती. पुढील दोन दिवसांसाठी 15 व 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून ताशी २५ ते ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेने दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मध्यम, तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. अरबी समुद्रात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाल्याने केरळहून गोव्याच्या दिशेने ताशी ५० ते ६० किमी वेगाने बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी दिवसभर पाऊस कायम राहिला. बुधवार आणि गुरुवारी राज्यभर मुसळधार पाऊस पडेल, असेही वेधशाळेने वर्तवले आहे. 

मंगळवारी मुरगाव व पणजी येथे जोरदार तर दाबोळी, म्हापसा, काणकोण भागात मध्यम ते तुरळक पावसाने हजेरी लावली. मुरगाव येथे सर्वाधिक ९ सें.मी. पावसाने हजेरी लावली. अन्य ठिकाणी पणजीत ७ सें.मी., एला (जुने गोवे) व दाबोळीत प्रत्येकी ६ सें.मी., म्हापशात ५ सें.मी., काणकोण येथे ४ सें.मी., पेडणे व साखळीत ३ सें.मी., तर वाळपई, मडगाव व सांगे भागात २ सें.मी., इतक्या पावसाची नोंद झाली.