Sat, Oct 24, 2020 09:27होमपेज › Goa › गोव्यात जलसफर, क्रुझ बोटींना परवानगी

गोव्यात जलसफर, क्रुझ बोटींना परवानगी

Last Updated: Oct 18 2020 1:14AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील पर्यटन उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारकडून क्रुझ बोट, पॅरासेलिंग तसेच जलक्रीडा उपक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांनी जारी केला आहे. सदर आदेश 15 ऑक्टोबरपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. 

कोरोनामुळे सर्व पर्यटन उपक्रम मार्च महिन्यापासून ठप्प होते. क्रुझ बोट तसेच जलक्रीडांना परवानगी देतानाच कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी व्यावसायिकांनी सुरक्षा तसेच स्वच्छतेसंबंधीची सर्व मार्गदर्शक तत्त्वे कठोरपणे पाळणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

गोव्यात दरवर्षी मोठ्या संख्येने देशी विदेशी पर्यटक येतात. यापैकी  अनेकजण गोव्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळ पाहण्याबरोबर जलक्रीडांचा थरार अनुभवण्याबरोबरच, क्रुझ बोटींद्वारे जलसफरीची मजासुद्धा लुटतात. पणजीतील सांता मोनिका जेटीवर तर पर्यटन हंगामात विशेषतः विकेंड काळात क्रुझ बोटींद्वारे जलसफर करण्यासाठी तर अक्षरशः गर्दी असायची. मात्र कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले होते. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटक आपल्या गावी परतले, सर्व पर्यटन उपक्रम बंद झाले. त्यामुळे आता सुमारे जवळपाळ सहा महिन्यांनंतर क्रुझ बोट तसेच जलक्रीडा उपक्रमांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पर्यटन खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार  कॅनोईंग, स्किम बोटर्डींग, काईट सर्फिंग, स्कुबा डायविंग, व्हिंड सर्फिंग, जेट स्किईंग, पॅरासेलिंग, याचिंग, काईट बोटिंग, रोविंग, राफ्टिंग आदी विविध जलक्रीडांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी 1 तास जलसफर घडवण्यासाठी क्रुझ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.

क्रुझ बोट तसेच जलक्रीडा व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना सॅनिटायझर देणे, ग्राहकांची थर्मलगनद्वारे तपासणी करणे,   ग्राहकांनी मास्क परिधान करणे, स्वच्छतागृहांमध्ये हँडवॉश ठेवणे, स्वच्छतागृहांमध्ये हात पुसण्यासाठी टॉवेलऐवजी  टीश्यू पेपर ठेवणे, क्रुझ बोट तसेच जलक्रीडा व्यावसायिक व त्यांच्या कर्मचार्‍यांना मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यास बजावणे, कर्मचार्‍यांची नियमितपणे थर्मलगनव्दारे तापमान तपासणे, कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणे आहे, की काही याची पडताळणी करणे आदी खबरदारी घेण्याचे पर्यटन खात्याने जारीकेलेल्या या आदेशात नमूद  केले आहे. 

 "