Mon, Sep 21, 2020 17:12होमपेज › Goa › माडेल घाऊक मासळी बाजारात पार्किंग शुल्क 100 वरून 800

माडेल घाऊक मासळी बाजारात पार्किंग शुल्क 100 वरून 800

Last Updated: Feb 16 2020 1:47AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

माडेलच्या घाऊक मासळी बाजारात मासळी घेऊन येणार्‍या गोव्याबाहेरील वाहनांना आता आठपट जादा पार्किंग शुल्क भरावे लागणार आहे. घाऊक मासळी बाजारात असलेली परप्रांतीयांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी एसजीपीडीएने तब्बल पंधरा वर्षांनंतर शुल्कवाढ लागू केली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत विरोधकांच्या विरोधाला न जुमानता एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी हा निर्णय घेतला असून यापुढे अवजड वाहनांना 100 रुपयांऐवजी 800 रुपये पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहे.

या बैठकीला फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, फोंडाचे आमदार रवी नाईक व इतर उपस्थित होते. विल्फ्रेड डिसा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जीएसआयडीसीच्या माध्यमातून घाऊक मासळी बाजाराचा विकास केला जाणार असून त्यासाठी एसजीपीडीए स्वतःचे 15 कोटी रुपये खर्च करणार आहे. घाऊक मासळी बाजारात बाहेरच्या राज्यांतून मासळी घेऊन येणार्‍या ट्रकांचे पार्किंग शुल्क 2005 साली ठरवण्यात आले होते.आता ते शुल्क तब्बल पंधरा वर्षांनंतर वाढवले जाणार असून त्यातून मिळणारा महसूल मासळी बाजाराच्या देखरेख आणि साफसफाईसाठी वापरला जाणार आहे. घाऊक मासळी बाजारातून एसजीपीडीएला दीड लाख रुपये एवढे उत्पन्न मिळत होते, पण त्यामानाने बाजारावर पाच लाख रुपये खर्च करावे लागतात. त्यासाठी पार्किंग, मासळी ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या टोपल्या आणि प्लास्टिकचे बॉक्स यांचे शुल्कसुद्धा वाढवण्यात आलेे आहे. मासळीच्या टोपल्यांसाठी 5 रुपये शुल्क होते, ते आता 20 रुपये करण्यात आले असून प्लास्टिकच्या बॉक्सचे शुल्क पाच रुपयांवरून पन्नास रुपये एवढे वाढवण्यात आले आहे. खासदार निधीतून पार्किंगच्या जागी पेव्हर्स बसवण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. पार्किंगच्या जागे शेजारी एसजीपीडीएच्या मालकीची सुमारे 3000 चौरस मीटर जागा उपलब्ध असून एसजीपीडीएसाठी महसुलाचे स्रोत निर्माण व्हावे यासाठी त्याठिकाणी एखादा मॉल किंवा इमारत प्रकल्प बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पार्किंगच्या जागेत फुडकोर्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एसजीपीडीए आणि घाऊक मासळी बाजारातील व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी मार्केट निरीक्षक नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्याव्यतिरिक्त घाऊक मासळी बाजारात मासळी ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे डिसा यांनी सांगितले.

सरकार लोकांना महाग मासळी देऊ पाहत आहे. पूर्वी मासळी घेऊन घाऊक मासळी बाजारात येणार्‍या ट्रकांकडून पार्किंग शुल्क म्हणून शंभर रुपये आकारले जात होते.आता हे शुल्क वाढवून आठशे रुपये करण्यात आले आहे. मिनी ट्रकांसाठी पन्नास रुपये होते ते आता सहाशे रुपये करण्यात आले आहे. पिकअपसाठी तीस रुपये शुल्क होते, त्याजागी आता 300 रूपयांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. रिक्षासाठी तीस रुपये शुल्क होते त्याजागी आता शंभर रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा परिणाम मासळीच्या किंमतीवरसुद्धा होईल, अशी भीती आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

भाजप सरकाने या पूर्वी गोव्याच्या फेणीवरसुद्धा कर लादला होता, आता मासळीवर सरकार कर लावू पाहत आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेतला असून अभ्यास करूनच प्रस्ताव चर्चेला आणावेत, अशी अट आपण एसजीपीडीएला घातली आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.कब्रस्तानासाठी आलेले पंधरा कोटी रुपये एसजीपीडीए दुसर्‍या कामासाठी वापरू पाहत आहे. कब्रस्तानासाठी संपादित करण्यात येत असलेली जमीन दुसर्‍या कामासाठी वापरण्याचाही त्यांचा विचार असून त्यास आम्ही विरोध केलेला आहे, असे ते म्हणाले. मडगावच्या एसजीपीडीएतील पार्किंग प्रकल्प आपण राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याकडून मंजूर करुन घेतला होता. आता तो प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. त्या शिवाय त्याठिकाणी फूड कोर्टचा प्रस्तावसुद्धा विचाराधीन आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आमदार विजय सरदेसाईंची टीका

पीडीएच्या दाव्यानुसार पार्किंग शुल्काचा दर 2005 सालाचा आहे आणि तो कधीच वाढवला गेला नव्हता. 2013 साली हा दर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता, पण ते शक्य झाले नाही. सध्या दरवाढीसाठी दाखल करण्यात आलेला प्रस्ताव आठ पटींनी जास्त आहे. त्याचा परिणाम मासळीच्या दरावर होणार आहे. सामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मासळी व्यावसायिकांना विश्वासात घेऊन शुल्कवाढीचा निर्णय घेणे आवश्यक होते. मासळी, तांदूळ आणि नारळ आम्ही अनुदानित किमतीत उपलब्ध करून देणार, असे आश्वासन देऊन आम्ही निवडून आलो होतो. आता तर सरकार फेणीवरसुद्धा कर लावू पाहत आहे. हे सरकार सामान्य जनतेच्या पोटावर उठले आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे

 "