Thu, Jan 21, 2021 16:00
पणजी : खाणप्रश्‍नाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

Last Updated: Dec 09 2020 2:08AM
पणजी ः पुढारी वृत्तसेवा

राज्यात प्रदीर्घ काळापासून बंद असलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची पुन्हा पुन्हा दिल्लीवारी आणि ‘तारीख पे तारीख’ हा सिलसिला काही संपताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारच्या दिल्लीवारीनंतर खाणप्रश्‍नाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर स्पष्ट झाले. केंद्र सरकार उत्सुक आणि राज्य सरकार प्रयत्नशील अशा शब्दांमध्ये खाणी लवकर सुरू होतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. 

दिल्लीत गुरुवारी केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी राज्य सरकार व खाण मालकांसोबत बैठक पार पडली आहे. राज्य सरकारने खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला काही प्रस्ताव दिले आहेत. त्याविषयी केंद्र सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सचिवालयात पत्रकारांना सांगितले. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार खाणींचा लिलाव करून खाण व्यवसाय सुरू करण्यासही राज्य सरकार सज्ज असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यातील खाणमालक अंबर तिंबले, वेदांता व अन्य खाण कंपन्याचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव परिमाल रॉय, खाण सचिव अनिल कुमार जैन यांची केंद्रीय खाण मंत्र्याशी बैठक झाली होती. केंद्र सरकार खाणींचा लिलाव करून खाण व्यवसाय सुरू करण्यास तयार आहे. तसे केल्यास खाण मालकांचा मालकी हक्क जाणार असल्याने ते विरोध करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते.

मुख्यमंत्री म्हणाले, खाण  अवलंबितांच्या हितासाठी कोणत्याही स्थितीत खाण व्यवसाय सुरू केला पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार खाणींचा लिलाव करून खाणी सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वीही खाणी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.’ 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘आपण मुख्यमंत्रीपद हाती घेतल्यापासून बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या 18 महिन्यांपासून खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकारच्या अडचणी व कायद्याच्या बडग्यामुळे सरकारला आतापर्यंत खाण व्यवसाय सुरू करणे शक्य झाले नाही. आता सरकारने खाणी सुरू करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान केलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडूनही राज्य सरकारला पाठिंबा मिळत आहे. खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून खाणीची गाडी रुळावर येण्यासाठी काही महिने जातील. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने राज्यात पुढील काळात खाण व्यवसाय सुरळीत सुरू होईल.’ 

खाणी कशाप्रकारे सुरू करणार ते आधी स्पष्ट करा 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यात लवकर खाणी सुरू होणार असल्याचे आश्‍वासन दोन वर्षांपासून देत आहेत. खाणींच्या संदर्भात त्यांची वक्‍तव्ये वारंवार  बदललेली आहेत. खरे म्हणजे खाण अवलंबितांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये. राज्यातील खाणी पुढील सहा महिन्यांत कशा प्रकारे सुरू करणार हे मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट करावे. नंतर आपण ठरवू शकेन की, मुख्यमंत्री खरोखरच खाणी सुरू करण्यासाठी गंभीर आहेत, की लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या अस्पष्ट वक्‍तव्यावर आपण विश्‍वास ठेवू शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत लोकांची दिशाभूल करण्यात मुरलेले राजकारणी असून ते राज्याची जबाबदारी झेपणारे नेते नाहीत, असे गोवा फाऊंडेशनचे निमंत्रक क्‍लॉड अल्वारीस यांनी सांगितले.

जिल्हा पंचायत निवडणूक  डिसेंबरमध्येच

राज्यात डिसेंबरच्या महिन्यात लांबणीवर टाकलेल्या जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यासाठी सरकारने शिक्‍कामोर्तब केले आहे. त्याबाबत राज्य निवडणूक आयुक्‍त चोेखाराम गर्ग यांच्याशी चर्चा केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जिल्हा पंचायतीची निवडणूक घेतली जाणार असून निवडणुकीची तारीख निवडणूक आयुक्‍त लवकरच जाहीर करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.