Wed, Aug 12, 2020 20:56होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांना अन्नातून विषबाधा

मुख्यमंत्र्यांना अन्नातून विषबाधा

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:02AMपणजी : प्रतिनिधी

अन्नातून विषबाधा झाल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 62) यांना गुरुवारी तातडीने मुंबईतील लीलावती इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले.   मुख्यमंत्री पर्रीकर यांना बुधवारी पोटदुखीचा त्रास जाणवल्यामुळे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा पोटदुखी सुरू झाल्यानंतर गोमेकॉच्या डॉक्टरांनी मुंबई येथील लीलावती इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा वैद्यकीय निष्कर्ष आहे.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांना बुधवारी रात्री पोटात दुखत असल्याच्या कारणावरून गोमेकॉत तपासणीसाठी आणण्यात आले होते.

ही पोटदुखी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाली असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा गोमेकॉत तपासणीसाठी आणण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती इस्पितळात नेण्यात आले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती आता ठीक असून ते रविवारी राज्यात परतण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दोन दिवस मुख्यमंत्री लोकांना भेटीसाठी उपलब्ध असणार नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गोवा विधानसभेचे अधिवेशन 19फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.  गेले काही  दिवस अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी मुख्यमंत्री रात्री  उशिरापर्यंत काम करत होते. त्यातच बुधवारी त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. यामुळे अर्थसंकल्पाच्या तयारीवर काहीअंशी परिणाम होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.