पणजी ः पुढारी वृत्तसेवा
ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याला येथील ग्रामस्थांचा विरोध राहणार आहे. त्यासाठी ‘ताळगावकरांचो एकवोट’ या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत विलीनीकरणामागे बाबूश मोन्सेरात हेच असून, त्यांनी येत्या रविवारपर्यंत जाहीरपणे येऊन पंचायत महापालिकेत विलीन करणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी ‘ताळगावकरांचो एकवोट’चे निमंत्रक अॅड. पुंडलिक रायकर यांनी केली. मोन्सेरात यांनी तसे जाहीर न केल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पंचायतीच्या प्रस्तावाची माहिती अधिकाराखाली माहितीही मागितली होती. त्यांनी सांगितले की, परंतु अजूनही त्याविषयी काही माहिती पंचायतीने दिली नसल्याचे सांगत अॅड. रायकर म्हणाले की, बाबूश मोन्सेरात हे मनोहर पर्रीकर यांनी ही पंचायत महापालिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव आणला होता. आता पर्रीकर नाहीत, त्यामुळे त्याविषयी आम्ही काही बोलू शकत नाही. मात्र, 2004 च्या विधानसभेत मोन्सेरात यांनी ताळगाव स्वतंत्र पंचायत राहावी यासाठी मते मागून विधानसभेची निवडणूक जिंकली.
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या आमदार असूनही त्या दृष्टीस पडत नाहीत. या पंचायतीत अंदाजपत्रकातील पैशाचा बोगस निविदा काढून गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे झाकण्यासाठीच हा विलीनीकरणाचा प्रकार चालला असावा, असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, आतापर्यंत ताळगावातील लोकांना मूर्ख बनविण्यात आले आहे. परंतु आता ताळगावातील लोकांना त्यांनी गृहीत धरू नये. महापालिकेत गेल्यास काय त्रास होऊ शकतो, हे लोकांना माहीत नाही. महापालिका कायद्यानुसार सुकूर, पेन्ह दी फ्रान्स, साल्वादोर दु मुंद, पिलार आणि सांताक्रूझ येथील भाग महापालिकेत येणार होता. परंतु या ग्रामपंचायीत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. ताळगावचा त्या कायद्यात समावेश नसतानाही विलीनीकरणाचा डाव आखला जात आहे.
ते म्हणाले की, आमदार बाबूश मोन्सेरात यांना जर असा कोणताही गैरप्रकार चालला नसल्याचे वाटत असेल, तर त्यांनी समोरासमोर चर्चेला यावे. याप्रसंगी झेव्हियर आल्मेदा, पीटर मारिया, जयराम व पंचायतीतील ग्रामस्थ उपस्थित होते.