Fri, Aug 07, 2020 15:36होमपेज › Goa › केवळ तातडीच्या नोकर भरतीची मुभा : मुख्यमंत्री 

केवळ तातडीच्या नोकर भरतीची मुभा : मुख्यमंत्री 

Published On: Sep 11 2019 2:29AM | Last Updated: Sep 11 2019 1:08AM
पणजी : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या ‘क’ वर्गातील नोकर भरती राज्य कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फतच व्हायला हवी. मात्र हा निर्णय सरसकट सर्व नोकरभरतीला लागू होणार नाही. प्रत्येक सरकारी खात्याने अत्यंत आवश्यक आणि गरजेच्या असलेल्या पदाबाबत कार्मिक खात्याकडे मागणी करून त्याबाबतीत ‘ना हरकत’ घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी रात्री उशिरा नोटीस काढून त्यात राज्य सरकारच्या सर्व खात्यातील ‘क’ वर्गातील कर्मचार्‍यांची नोकरभरतीची जाहिरात रद्द करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सरसकट सर्व नोकरभरतीला लागू होत नसून फक्‍त ‘क’ वर्गातील कर्मचार्‍यांपुरता लागू करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारातील काही खात्यांनी नोकरभरतीसाठी जाहिरात दिली असून प्रक्रियाही सुरू केली आहे. या नोकरभरतीसाठी सदर खात्याने कार्मिक खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. या खात्यातील कोणती पदे आवश्यक आणि तातडीने भरण्याची गरज आहे ते पाहून नोकरभरतीला मान्यता दिली जाणार आहे. 

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकाराबाबतच्या विधेयकाला मान्यता दिली असली तरी सध्या हे विधेयक राज्यपाल डॉ. मृदूला सिन्हा यांच्याकडे आहे. राज्यपालांनी सदर विधेयकाला मान्यता दिल्यानंतरच नोकर भरतीची प्रक्रिया आयोगामार्फत होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारी नोकरभरती बंदीचा आदेश जारी केला होता. या निर्णयाचा भाजपला निवडणुकीत फटका बसला होता.