Mon, Jul 06, 2020 10:57होमपेज › Goa › कांदा ६५ रुपयांत दोन दिवसांत उपलब्ध

कांदा ६५ रुपयांत दोन दिवसांत उपलब्ध

Last Updated: Dec 05 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी
कांदा दरवाढीमुळे राज्यातील अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याची दखल घेऊन सोमवारी कांदा पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली असून त्यात नाशिक, सातारा आणि दावणगिरी या भागातील तीन पुरवठादारांनी केवळ रोख खरेदीवर कमी किमतीत कांदा पुरवण्याचे मान्य केले आहे. यासंबंधीची फाईल मान्यतेसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. तिला मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारपर्यंत कांदापुरवठा झाल्यास फलोत्पादन केंद्रात हा कांदा 65 रुपये किलो दराने विकला जाणार असल्याची माहिती राज्य फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

आ. झांट्ये म्हणाले की, राज्यात कांद्याचे दर चढेच असून कांदा उत्पादन क्षेत्रात खराब वातावरण आणि पावसामुळे किमान महिनाभर कांद्याचे दर उतरण्याची शक्यता कमी आहे. बेळगाव, हुबळी, सांगली, कोल्हापूरच्या घाऊक बाजारपेठेतून कांदा गोव्याच्या बाजारपेठेत येतो. त्या भागात जादा प्रमाणात पाऊस पडल्याने कांद्याचे पीक कुजलेले आहे. मागील दोन दिवसांतसुद्धा बारामती, कर्नाटक आणि तामीळनाडूतही पाऊस पडला आहे. यामुळे कांद्याचे पीक आणखी खराब झाले असून कांद्याचा दर आणखीन वाढणार आहे. याचा विपरीत परिणाम किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठांवर झाला असून तेथे कांदाच उपलब्ध नाही. 

गोमंतकीयांना कांदा कमी दरात मिळण्यासाठी राज्य प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कांदा दरवाढीची दखल घेतली असून सरकारतर्फे लोकांना शक्य तेवढ्या कमी दरात कांदा उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी घाऊक कांदा पुरवठादारांकडे सोमवारी बोलणी करून आपण, फलोत्पादन महामंडळाच्या अधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्री सावंत आणि कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत पुरवठादारांची बिलाची रक्‍कम रोखीत फेडण्याची अट असल्याचे सांगितले असून त्यासाठी आवश्यक निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

फलोत्पादन केंद्रात कांदा कमी भावात विकला जात नसल्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारी येत असल्याबाबत प्रश्‍न केला असता झांंट्ये म्हणाले की, ग्राहकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की खुद्द बेळगावसारख्या कांदा उत्पादन होणार्‍या जिल्ह्यात कांद्याचा सध्याचा दर 90 रुपयांवर पोचला आहे. कांद्याच्या दर्जानुसार हा दर 100 ते 110 रुपये प्रति किलो असाही आहे. आमच्या केंद्रात विकला जात असलेला कांदा हा सर्वात स्वस्त आहे. केंद्रात सध्या 79 रुपये दराने कांदा विक्री केला जाते. मात्र, राज्यातील खुल्या बाजारात विकल्या जाणार्‍या कांद्याच्या दरावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. 

सरकारकडून फलोत्पादन महामंडळाच्या जुन्या पुरवठादारांची बिले तसेच विक्रेत्यांना देण्यात येणार्‍या अनुदानाची सुमारे 34 कोटी रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी मिळण्यासाठी सर्व पुरवठादारांकडून व विक्रेत्यांकडून तगादा सुरू आहे. नियमित पुरवठादारांकडून 5 ते 6 महिन्यांचा वेळ दिला जातो. यासाठी आम्ही सरकारकडे मागील 34 कोटी तसेच कांदा रोखीने खरेदी करण्यासाठी अतिरिक्त सात कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. सरकारकडून काय पावले टाकले जाणार यावर पुढील दिशा निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पादन घटल्याने दरवाढ
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने या कांद्याला बाजारात मोठी मागणी असून दरात वाढ झाली आहे. मात्र, सदर कांदा पुरवठादारांना आगामी 10 दिवसांपर्यंत आगाऊ रक्‍कम देऊन माल पुरवण्याची ऑर्डर दिली जात आहे. वाढत्या मागणीमुळे फक्‍त रोखीने व्यवहार करण्यास पुरवठादार तयार आहेत. रोखीने रक्‍कम फेडल्यास आणखीन पुरवठादारही कांदा पाठवण्यास तयार होणार असून कांद्याचा दर आणखी कमी होणार आहे. फलोत्पादन महामंडळाला दर दिवसा 30 ते 40 टन कांदापुरवठा केला जाणार असून या मालाचे 7 कोटी रुपये रोखीने देण्याची मागणी पुरवठादारांनी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे 7 कोटी रुपये तातडीने देण्याची मागणी महामंडळातर्फे करण्यात आली असल्याचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनी सांगितले.