Sun, Sep 27, 2020 00:52होमपेज › Goa › येडियुरप्पा भेटीविषयी माहिती नाही : मुख्यमंत्री  

येडियुरप्पा भेटीविषयी माहिती नाही : मुख्यमंत्री  

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 1:48AM
पणजी : प्रतिनिधी

म्हादई जलतंट्याबाबत कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आपल्या भेटीला येणार असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. अशा भेटीची मागणी केली असल्याचीही आपल्याला कल्पना नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी म्हादई  जलतंट्याबाबत कर्नाटक आणि गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बैठक घेऊन सामोपचाराने तोडगा काढावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना आपण गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांना 16 वा 17 सप्टेंबर रोजी भेटणार असल्याचे सांगितले होते. यासाठी आपण वेळ मागितली असल्याचेही  त्यांनी म्हटले होते. 

या भेटीबाबत मुख्यमंत्री सावंत यांना बुधवारी विचारले असता, ते म्हणाले, की आपल्याकडे म्हादई प्रश्‍नावर चर्चा करण्यास येण्याचा कोणीही प्रस्ताव अजून दिला नाही. आपल्या माहितीनुसार, अशी कुठलीही भेट ठरवण्यात आली नाही. 

म्हादई प्रश्‍न न्यायप्रविष्ट; चर्चेची गरज नाही : ढवळीकर 

म्हादई जलतंट्याबाबत कुठेही राज्याच्या हिताला बाधा होऊ शकेल, अशी भूमिका राज्य सरकारने घेऊ नये. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले असताना त्यात सामोपचाराने तोडगा काढण्याची गरजच नाही. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्याच्या मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली तरी त्यात राज्याचे हिताला धक्‍का बसू नये, याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घ्यावी, असे मत मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी व्यक्‍त केले.