Tue, Jul 07, 2020 17:23होमपेज › Goa › नवभारत घडविण्यासाठी मोदींना साथ द्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नवभारत घडविण्यासाठी मोदींना साथ द्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Published On: Apr 21 2019 1:39AM | Last Updated: Apr 21 2019 1:39AM
मडगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकट्याने नवभारत घडवणे शक्य नाही. त्यासाठी सर्वांची साथ मिळणे गरजेचे आहे. गरिबी हटाव, स्वच्छ भारत अभियान, स्किल इंडिया या संकल्पनांवर आधारित नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मडगावच्या लोहिया मैदानावर उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

या सभेत गोवा फॉरवर्डचे नेते तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, उमेदवार नरेंद्र सावईकर, मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, आर्थर डिसिल्वा, सर्वानंद भगत, रुपेश महात्मे, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गदास कामत  उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, काही लोकांना देशापेक्षा भाऊ मोठा वाटतो. म्हणून त्यांची अशी अवस्था झाली आहे. हे सरकार मजबूत आहे आणि राहिलेली तीन वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सरकार स्थापन करताना एक फॉर्म्युला ठरलेला होता. तो मगोपने मोडला म्हणून ते सरकारबाहेर पडले. पणजी स्मार्ट सिटी झाली आहे आणि आता आर्थिक राजधानी म्हणून मडगावचा विकास झपाट्याने होणार आहे, असे सावंत म्हणाले. काँग्रेसने देशावर पन्नास वर्षे राज्य केले. या पन्नास वर्षांत त्यांना जनतेला 72 रुपये देता आले नाही, ते आता प्रत्येकाच्या खात्यावर 72 हजार देण्याच्या गोष्टी करत आहेत. महात्मा गांधी यांच्यानंतर झाडू घेऊन रस्त्यावर उतरणारे मोदी एकमेव आहेत. पाच वर्षांत देशावर दोन आतंकवादी हल्ले झाले. यापूर्वी तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग निषेध करत होते पण मोदी यांनी आतंकवाद्यांना घुसून मारा, असे आदेश दिले. सैन्याने आतंकवाद्यांना त्यांच्या हद्दीत घुसून ठार मारले. हे केवळ मोदी सरकारच्या काळात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले की, सासष्टीत पासपोर्ट कार्यालय, मुस्लीम बांधवांसाठी कब्रस्तानासह अनेक सुविधा गोवा फॉरवर्डने निर्माण केल्या. सरकारचा पाठिंबा मिळाल्याने ते शक्य झाले. आम्ही सरकारला पाठिंबा दिला असला तरी आम्ही आमची जागा विसरलेलो नाही. भाजपला पाठिंबा दिल्यामुळे आपल्यावर टीका झाली आणि आजही होत आहे. 

नरेंद्र सावईकर म्हणाले की, भारत देशाच्यादृष्टीने ही महत्वपूर्ण निवडणूक आहे. गोव्याच्या विकासाला केवळ नरेंद्र मोदी साह्य करू शकतात. काँग्रेसने सात वर्षांपूर्वी जुआरीच्या पुलासाठी शीलान्यास केला होता. पण पुलाचे काम सुरू होण्यास भाजप सरकार सत्तेत यावे लागले. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्याविषयी आपुलकी आहे, म्हणून त्यांनी गोव्याला भरभरून दिले. काँग्रेसने 55 वर्षे देशावर राज्य केले. पण अजून त्यांना गरीबी हटावचा नारा द्यावा लागत आहे, हे दुर्दैव आहे. काँग्रेसने दाबोळी विमानतळ बंद पडणार अशी टीका केली होती. विमानतळ बंद पडायचे सोडा पण या विमानतळाचे कोट्यवधी रुपये खर्च करून विस्तारीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती नरेंद्र सावाईकर यांनी दिली. धर्म, जात-पात असा भेदभाव करणार्‍या पक्षाच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन सावईकर यांनी केले.

उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी  मगोप आणि सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली. सुदिन ढवळीकर यांनी शिरोड्यात दीपक ढवळीकर यांना उभे करून सरकारचा विश्वासघात केला. भाजप सरकार त्यांना पाडायचे होते. त्यामुळे आपण व आमदार दीपक पावसकर यांनी भाजपात प्रवेश केला. ढवळीकर यांच्यासाठी राजकारण हा धंदा झालेला आहे. भाजप हा सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यकाळात राज्याचा किती विकास केला आहे, याची तुलना करून पहावी, असे आवाहन त्यांनी केले.

देशाला सुरक्षा देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. नोटबंदी करण्याचे धाडस त्यांनी केले. त्यामुळे केंद्राला जास्त प्रमाणात कराच्या स्वरूपात पैसा आला. तो पैसा विकासावर खर्च करता आला. जीएसटीच्या माध्यमातून दर महिन्याला एक लाख कोटीपेक्षा जास्त महसूल देशाला येत आहे. भाजप सरकारला पाठिंबा देऊन विजय सरदेसाई यांनी उत्कृष्ट काम केल्याचे  माविन गुदिन्हो म्हणाले. 

यावेळी बबिता आंगले, गोवा फॉरवर्डचे नेते अकबर मुल्ला,आर्थर डिसिल्वा, उल्लास तुयेकर यांनीही आपले विचार मांडले.