होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी सरदेसाईंची धमकी हास्यास्पद

खाणप्रश्‍नी सरदेसाईंची धमकी हास्यास्पद

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:02AMडिचोली ः प्रतिनिधी

गोवा फॉरवर्डचे नेते तसेच सरकारचे महत्त्वाचे घटक असलेले मंत्री विजय सरदेसाई यांनी खाणप्रश्‍नी सरकारला दिलेली धमकी हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे तिसवाडी गट अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

पणजीकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असून सारा कारभार विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर व फ्रान्सिस डिसोझा हाताळत  आहेत, असे असताना खाणी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सोडून सरकारला धमकी देणे म्हणजे आपणच अकार्यक्षम आहोत, हे दाखवून दिल्यासारखे आहे. सरकारात असूनही खाणी सुरू का होत नाहीत याचे उत्तर सरदेसाई यांनी देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारचे घटक असलेले सरदेसाई यांनी मयेतील समस्यांबाबत वाचा फोडली आहे. मात्र, या समस्या निर्माण कोणी केल्या, खाणी कुणी बंद केल्या याचे उत्तर  दिले नाही, असेही ते म्हणाले. विजय सरदेसाई हेच सध्या राज्याचे सूत्रधार आहेत. त्यामुळे खाणी सुरू करण्यासाठी का पुढाकर घेतला नाही, याचे अगोदर उत्तर द्यावे, असेही अमरनाथ पणजीकर म्हणाले.

दरम्यान, गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केलेल्या संतोष सावंत यांच्याबाबत पणजीकर म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी संतोष सावंत यांना ऐनवेळी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. सात हजार मते मिळवून दिली. तरीही त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली, हे योग्य नाही. निवडणुकीनंतर पक्षासाठी त्यांनी कसलेच काम केले नाही. प्रत्येकजण आमदार होण्याची  स्वप्ने पाहात आहेत. सावंत पक्षातून बाहेर पडल्याने पक्षाला कसलेच नुकसान होणार नाही. नवा नेता कार्यकर्त्यांना घेऊन नव्या दमाने पक्षाचे कार्य पुढे नेणार आहे. यावेळी विजय भिके, आनंद नाईक, अशोक नागवेकर, बाबी च्यारी उपस्थित होते.