Thu, Aug 13, 2020 16:56होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी गोव्याच्या हिताशी तडजोड नाहीच

म्हादईप्रश्‍नी गोव्याच्या हिताशी तडजोड नाहीच

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:46AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकाला पिण्यासाठी म्हादईचे पाणी देण्यासंदर्भात कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना पाठवलेले पत्र आपण कुठल्याही दबावाखाली लिहिलेले नाही. ते  पत्र कायदेशीररित्या योग्यच असून  गोव्याच्या हिताशी कुठेही तडजोड केलेली नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

म्हादईच्या खटल्याची लवादासमोर सुनावणी सुरू असल्याने  कर्नाटकसोबत द्विपक्षीय चर्चा ही म्हादई लवादाच्या अखत्यारीत राहूनच केली जाईल. कर्नाटकमध्ये जे सरकार चालवत आहेत त्यांच्यावर आपला विश्‍वास नाही. त्यामुळेच आपण  येडियुरप्पा यांना त्यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात पाठवलेल्या पत्राला उत्तर पाठवले असल्याचे त्यांनी  म्हटले.पर्रीकर म्हणाले, म्हादईप्रश्‍नी  कर्नाटकसोबत व्दिपक्षीय चर्चा करण्यासंदर्भात येडियुरप्पांना पाठवलेल्या पत्राविषयी मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीवेळी माहिती देण्यात आली आहे. 

साक्षीदार म्हणून  तयार  करण्याचा निर्णय 

पणजी (प्रतिनिधी) : 2012  पासून  म्हादई खटल्यात गोव्याची बाजू भक्कम व्हावी, यासाठी चांगले साक्षीदार  आपण  शोधत होतो. परंतु  काही मोजकेच लोक पुढे आले. मात्र, आता म्हादई प्रश्‍नाची सखोल माहिती असणार्‍या पत्रकार,  स्वयंसेवी संघटनांची यादी करुन त्यांना साक्षीदार म्हणून  तयार  करण्याचा निर्णय घेतला आहे, असे  पर्रीकर म्हणाले,  

येडियुरप्पांना लिहिलेले पत्र कायदेशीर सल्‍ला घेऊनच  पाठवण्यात आले आहे. सदर पत्र हे कायदेशीररित्या योग्य  असून  म्हादई खटल्यात गोव्याची बाजू मांडणारे अतिरिक्‍त सॉलिसीटर जनरल अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी यांनीदेखील तसे नमूद केले  आहे. त्या पत्रात केवळ व्दिपक्षीय चर्चेचा उल्‍लेख आहे. पत्रात पिण्याचे पाणी देण्याचे मान्य केल्याचे नमूद केलेले नसून येडियुरप्पा यांनी पाठवलेल्या पत्राला केवळ आपण उत्तर दिले आहे, असेही ते म्हणाले.

विरोधकांकडून पत्रावरून  विनाकारण म्हादईच्या पाण्याचा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकला पाठवलेल्या पत्रासाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीची गरज नाही.आपण पत्र येडियुरप्पा यांना पाठवले आहे. मात्र, जर कर्नाटकचे मुख्यमंत्री  सिध्दरामय्या यांनी म्हादईबाबत आपल्याला  पत्र  पाठवले तर त्याला आपण नक्‍की उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले.