इफ्फीच्या तयारीसाठी आढावा बैठक

Last Updated: Oct 10 2019 8:16PM
Responsive image


पणजी : प्रतिनिधी

राज्यात नोव्हेंबर महिन्यात 50वा सुवर्णमहोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात आला आहे. इफ्फीतील विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी नवी दिल्लीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुवर्ण महोत्सवी इफ्फी संदर्भात महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, सीइओ अमित सतिजा, व्यवस्थापकीय संचालक मृणाल वाळके व चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, महोत्सवाच्या प्रतिनिधी नोंदणीला 1 सप्टेंबरपासून सुरवात झाली आहे.  इफ्फी 2019 मध्ये भारतातील फिल्म व मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी गतवर्षाप्रमाणे यंदा देखील मोफत नावनोंदणी करून महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात. इफ्फीसाठी नावनोंदणी करायला मास कम्युनिकेशन किंवा फिल्म संस्थेचे विद्यार्थी असणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांकडून बोनाफाईड प्रमाणपत्र महत्वाचे आहे. तसेच नोंदणी करतेवेळी विद्यार्थ्यांचे वय 18 किंवा त्याहून अधिक असणे बंधनकारक आहे. 

विद्यार्थी प्रतिनिधींना देखील अन्य प्रतिनिधींप्रमाणेच इफ्फीतील सुविधांचा लाभ घेता येईल. यात कार्यशाळा, मास्टरक्लास, चित्रपट प्रदर्शन, मोफत वाय फाय, प्रतिनिधी किट, ऑनलाईन तिकिट बुकिंग अशा सर्व सुविधांचा समावेश आहे. मीडिया नोंदणी अंतर्गत  होणार्‍या प्रतिनिधी व छायाचित्रकारांसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला अद्याप सुरूवात झालेली नाही. इफ्फी त यंदा 250 हून अधिक चित्रपट व अनेक चित्रपटांचे प्रिमियर देखील होणार आहे.