Fri, Jul 10, 2020 19:56होमपेज › Goa › केंद्राच्या मदतीने गोव्यात मरिटाईम क्‍लस्टर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

केंद्राच्या मदतीने गोव्यात मरिटाईम क्‍लस्टर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

Last Updated: Nov 17 2019 1:23AM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यातील छोट्या, लघु व मध्यम उद्योगांना तसेच जहाज बांधणी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने सरकार गोव्यात मरिटाईम क्‍लस्टरची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पणजीत सीआयआय तसेच गोवा शिपयार्ड यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सांगितले. किनारी राज्य असलेल्या गोव्यातील जहाज बांधणी क्षेत्राला जास्तीत जास्त चालना मिळावी व गोव्याची जहाज बांधणी हब म्हणून ओळख तयार व्हावी, यासाठी मरिटाईम क्‍लस्टर स्थापन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, या मरिटाईम क्‍लस्टरसाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकार केंद्र सरकारच्या छोट्या, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयाशी हा प्रकल्प स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची हा मरीटाईम क्‍लस्टर स्थापन करण्यास राज्य सरकारला मदत प्राप्‍त होईल. मरीटाईम क्‍लस्टर हा प्रकल्प दक्षिण गोव्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून एक खिडकी सुविधा तयार करण्यात आली असून त्या अंतर्गत 30 दिवसांत उद्योगांना परवाने जारी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय स्टार्टअप तसेच ओद्यौगिक धोरण, पायाभूत सुविधा, विदेशी गुतंवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी करांची सुविधा आदीचा यात समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. बी नागपाल म्हणाले, छोट्या, लघु तसेच मध्यम उद्योगांना गोव्यात मोठी संधी आहे. गोवा सरकार तसेच गोवा शिपयार्डकडून राज्यात जहाजबांधणी उद्योगाला पोषक वातावरण तयार करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक उद्योगांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.