Mon, Nov 30, 2020 13:48महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही भाजप सरकार खाली खेचणार

Last Updated: Nov 25 2020 1:24AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलपणजी : पुढारी वृत्तसेवा

‘महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचणार’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे केले. भाजपला सत्तेपासून रोखण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, असे त्यांनी जोशपूर्ण भाषणात ठणकावून सांगितले. 

येथील आझाद मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी सायंकाळी सभा झाली. सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाटो-पणजी येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी झालेल्या सभेस लक्षणीय संख्येने लोकांनी गर्दी केली होती. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी नरेंद्र वर्मा, गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव आदी उपस्थित होते. 

पटेल म्हणाले, ‘महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर दिलेली होती. परंतु आम्ही ती धुडकावली. भाजपला आम्ही सत्तेपासून रोखले. काँग्रेसच्या जागा कमी असताना काँग्रेससह आम्ही शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास सांगितले. शिवसेनेलाही आम्ही भाजपपासून वेगळे केले. यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो. गोव्यातही असे होऊ शकते आणि भाजपला सत्तेपासून रोखण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.’ गोव्यातील काँग्रेसचे दिगंबर कामत सरकार धोक्यात होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कामत सरकार वाचवल्याची आठवण पटेल यांनी करून दिली. 

चर्चिल आलेमाव यांनी आपल्या  घणाघाती भाषणात काँग्रेसला लक्ष केले. प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार असतानाच गोव्यामध्ये कॅसिनो आले, याची आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेसचे दिगंबर कामत सरकार असताना गोव्यामध्ये कोळसा आला, याचेही दाखले त्यांनी दिले.