Sun, Sep 27, 2020 03:46होमपेज › Goa › लवू मामलेदार यांची ‘मगो’तून हकालपट्टी

लवू मामलेदार यांची ‘मगो’तून हकालपट्टी

Published On: Mar 24 2019 1:17AM | Last Updated: Mar 24 2019 1:17AM
पणजी : प्रतिनिधी 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या केंद्रीय समितीने शनिवारी माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस लवू मामलेदार यांची पक्षातून हकालपट्टी केली. सांतइनेज येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय कार्यकारी समितीकडून यासंबंधी ठराव घेण्यात आला. मामलेदार यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  

मगोपचे नवीन संयुक्त सरचिटणीस म्हणून प्रताप फडते यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत कार्यकारी समितीचे अकरा सदस्य उपस्थित होते. मामलेदार यांची हकालपट्टी करण्याचा हा ठराव 8 विरूध्द 4  मतांनी मंजूर झाला. दोन  सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

समितीच्या सदस्यांसोबत पक्षाचे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर निघताना कार्यकर्त्यांनी लवू मामलेदार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यालयातून बाहेर निघेपर्यंत कार्यकर्त्यांनी मामलेदार यांना ‘हुश्यो’ घालून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. 

गेल्या दीड वर्षांपासून लवू मामलेदार पक्षाविरोधात कारवाया करीत होते. मामलेदार यांना समितीतील सदस्यांकडून वेळोवेळी समजावले होते. परंतु त्यांच्या सांगण्याकडे मामलेदार यांनी कानाडोळा केला. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे हाच शेवटचा पर्याय होता, असे दीपक ढवळीकर यांनी सांगितले. 

मामलेदार यांनी  शुक्रवार दि.22 रोजी थेट राज्यपाल व सभापती यांना मगोतर्फे आपले मतच ग्राह्य धरले जावे, अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्याचबरोबर त्यांचे अन्य व्यवहार संशयास्पद होते, असेही ढवळीकर यांनी सांगितले. 

येत्या 30 एप्रिल रोजी पक्षाची आमसभा होणार असून केंद्रीय समितीने घेतलेल्या ठरावावर चर्चा होईल. हा ठराव  मंजूर करून घेतला जाईल. विद्यमान कार्यकारिणी समितीचा कार्यकाळही याच दिवसांत संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन समितीची निवड ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार असल्याचेही दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.  

शिरोड्यातून निवडणूक लढविणार ः ढवळीकर

विरोधी पक्षांकडून मगोपमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मगोपचे तीनही  आमदार पक्षासोबत असून कोणताच आमदार पक्षांतराच्या विचारात नाही. गेल्या काही  दिवसांपासून मगो पक्षासंदर्भात ज्या अफवा पसरविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. या अफवांना आम्ही  भीकही  घालत नाही. शिवाय शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर आम्ही ठाम आहोत, असे दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

न्यायालयात जाणार : मामलेदार

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून आपली पक्षातून हकालपट्टी केल्याच्या निर्णयाला आपण  न्यायालयात  आव्हान देणार असल्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी सांगितले. 

मामलेदार म्हणाले, पक्षाच्या सरचिटणीस पदावरून आपल्याला काढून टाकण्यात आले आहे. यासंबंधी आपण न्यायालयात जाणार आहे. आपण सभापतींना पत्र लिहिल्याने समितीकडून ही कारवाई करण्यात आली. 

राजकारण हा आपला व्यवसाय नसून राजकारणात राहून आपण पोट भरलेले नाही. 2017 मध्येदेखील आपण अशाच प्रकारे पत्र लिहिले होते, तेव्हापासूनच आपल्याला पक्षातून काढण्याचा कट सुरू आहे. आपण या संदर्भात लवकरच न्यायालयात जाणार आहे. प्रामाणिकपणाने काम केल्याची ही पावती आहे, अशी टीका करत पक्षाने आपल्या विरोधात हा चुकीचा निर्णय घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सांतइनेज येथे मगो पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मामलेदार यांची पक्षातून हकालपट्टी   करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कार्यालयातून बाहेर पडताना मामलेदार यांनी पत्रकारांना बैठकीत घेतलेल्या निर्णयासंदर्भात सांगून त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. पक्षाचे समर्थक यावेळी कार्यालयाबाहेर हजर होते. मामलेदार पत्रकारांना माहिती देतानाही समर्थकांची घोषणाबाजी सुरूच होती. सदर समर्थक पक्षाने पैसे देऊन आणलेले आहेत, अशी टीका मामलेदार यांनी यावेळी केली.  

मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची ढवळीकरांची योजना होती. मात्र, आपण याला विरोध करून एकटाच पक्षा चालवीन, तुम्ही पक्षातून बाहेर पडा, असे त्यांना बजावले होते. त्यांची ही योजना सफल झाली नाही. तिथूनच सर्व वाद सुरू झाले होते. प्रमोद सावंत यांच्या शपथविधीच्या  दिवशी दीपक पाऊसकर व मनोहर आजगावकर हे  मगो पक्षातून बाहेर पडले होते, हेदेखील खरे आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे सर्व  स्थिरस्थावर झाले, असेही मामलेदार यांनी सांगितले.  

या सर्व प्रकरणात दीपक ढवळीकर यांची काहीही चूक असल्याचे आपल्याला वाटत नाही.   त्यांना एका व्यक्तीकडून  निर्देश येतात, त्याप्रमाणे ते कारवाई करतात. निर्देश कुणाकडून येतात त्या व्यक्तीचे नाव सांगणार नाही, असेही मामलेदार म्हणाले. ढवळीकरांकडे जोपर्यंत पक्ष आहे, तोपर्यंत लोक पक्षात यायला तयार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

शनिवारी दुपारी झालेल्या मगो कार्यकारी समितीच्या बैठकीत एकूण 15 सदस्य समितीतील आठ विरोधात चार अशा बहुमताने आपल्याला पक्षातून काढण्यात आले. दोन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली.  योगानंद फडते हे आजारपणामुळे बैठकीला हजर राहू  शकले नाहीत, अशी माहिती मामलेदार यांनी दिली.