Sat, Sep 19, 2020 10:18होमपेज › Goa › स्वसंरक्षणासाठी पिस्तूल परवाने द्या 

स्वसंरक्षणासाठी पिस्तूल परवाने द्या 

Last Updated: Sep 18 2020 1:47AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगावातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक आणि भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कृष्णी वाळके यांचे पुत्र स्वप्निल वाळके यांची भर दुपारी बाजारात गोळ्या घालून आणि सुरा भोकसून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर दक्षिण गोव्यातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. खुनाच्या घटनेने हादरून गेलेल्या व्यापार्‍यांनी स्वसंरक्षणाकरिता स्वतःकडे पिस्तूल बाळगण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्यास सुरू केले आहे.

गेल्या सहा महिन्यांत दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे एकूण पंधरा अर्ज विचाराधीन असून त्यातील निम्मे अर्ज वाळके खून प्रकरणानंतर आलेले आहेत.खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखीही लोक पिस्तुलासाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. स्वप्निल वाळके खून प्रकरणानंतर व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ज्या पद्धतीने वाळके यांना भर दुपारी आणि तेही भर बाजारात मारण्यात आले ते पाहता राज्यात व्यवसायिक सुरक्षित नाहीत अशी भावना सर्वामध्ये पसरली आहे.मडगाव ही राज्याची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.मोठमोठ्या ब्रॅण्डच्या दागिन्यांचे शोरूम,दागिने बनवणार्‍या कारागीरांची दुकाने, पारंपरिक सराफ,घाऊक आणि किरकोळ मासळी बाजार,घाऊक स्टील आणि घाऊक पद्धतीने घरगुती साहित्याची विक्री करणारी दुकाने तसेच त्यांची किरकोळ दुकाने,हजारांपेक्षा जास्त दुकाने असलेली न्यू आणि गांधी मार्केट अशा रोकड पद्धतीने चालणार्‍या व्यवसायावर वाळके खून प्रकरणानंतर भीतीचे सावट निर्माण झाले आहे.स्वप्निल वाळके यांचा खून पैशांसाठी केला गेला, असे प्राथमिक तपासात उघड झाले असले तरीही या प्रकरणाची पाळेमुळे बरीच खोल गेल्याचे दिसून येत आहे.सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.स्वप्निल वाळके खून प्रकरणाने धास्तावलेल्या व्यापार्‍यांनी पोलिस महानिरीक्षकांकडे आपली कैफियत मांडली असली तरीही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनातून न गेल्याने अनेकांनी आता स्वरक्षणासाठी पिस्तूल बाळगण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दक्षिण गोव्यात पिस्तूल बाळगणार्‍यांपेक्षा बंदूका बाळगणार्‍यांची संख्या जास्त आहे. अधिकांश बंदुका बागायतदारांनी रानटी श्वापदांपासून बागायतीचे रक्षण करण्यासाठी खरेदी केल्या होत्या.निवडणुकीच्या काळात या बंदुका पोलिस स्थानकात जमा कराव्या लागत आहेत.अनेकदा  जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी या बंदुकांचा वापर केला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.  

अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी पुढारीशी बोलताना सांगितले,की एकूण पंधरा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात विचाराधीन आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून केवळ पिस्तुलासाठी अर्ज आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.वाळके यांच्या खुनाच्या घटनेनंतर अर्ज आले,असे म्हणता येणार नाही.पिस्तुल बाळगण्यासाठी खास प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, त्याच बरोबर ते पिस्तुल मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून खरेदी करावे लागते.पिस्तूल खरेदी करण्यापूर्वी पोलिसांच्या मान्यतेची आवश्यकता आहे, असे नाईक म्हणाले.

 "