Wed, Apr 01, 2020 00:26होमपेज › Goa › विद्यार्थ्याला भोसकल्याप्रकरणी आणखी दोघाजणांना अटक

विद्यार्थ्याला भोसकल्याप्रकरणी आणखी दोघाजणांना अटक

Last Updated: Jan 22 2020 2:10AM
पणजी : प्रतिनिधी

दोनापावला येथे आलेला गोवा विद्यापीठातील मतीउल्ला अरिया (वय 24) या विद्यार्थ्याला सुर्‍याने भोसकल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी मंगळवारी डेस्मंड डायगो फर्नांडीस (29) व सुरेश बसवराज मेगेरी (24) या आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणी सोमवारी सतीश निळकंठी (24) याला पोलिसांनी अटक केली होती.पोलिसांनी या सुरी हल्ल्याची दखल घेऊन भा. दं. सं. 326 कलमान्वये या तिघांविरूद्ध गुन्हा नोंदविला असून या तिघांना मंगळवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी सांगितले.

पोलिसांनी या हल्ला प्रकरणाचा तपास केला असता दारुच्या नशेत हे प्रकरण झाल्याचे उघडकीस आले आहे. अफगाणिस्तानातील विद्यार्थी मतीउल्ला अरिया व प्रा. राहुल त्रिपाठी हे दोघे रविवारी 7 वाजता दोनापावला येथे आले होते. त्यांची दुचाकी उभी करताना घसरून तिथे उभे असलेल्या तिघांना लागली. त्यानंतर उभयतांमध्ये वाद उफाळून येऊन प्रकरण हातघाईवर गेले. या मारामारीत एकाने मतीउल्ला अरिया याच्या पाठीत सुरा खुपसला. अरीया याच्यावर बांबोळीतील गोमॅकोमध्ये  उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.