दक्षिण गोव्यात ‘होम क्‍वारंटाईन’ खलाशी फिरताहेत खुले 

Last Updated: Mar 27 2020 1:22AM
Responsive image


मडगाव : पुढारी वृत्तसेवा

जहाजावरून नुकतेच उतरलेले खलाशी स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवण्याऐवजी बेजबाबदारपणे समाजात फिरू लागल्यामुळे दक्षिण गोव्यात दहशतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. केपे, सांगे, कुडचडे तसेच नावेली परिसरात गेल्या चार दिवसांत शेकडो खलाशी उतरले असून त्यांना चौदा दिवस ‘होम क्वारंटाईन’ होण्याची सूचना मिळूनही ते सामान्य लोकांमध्ये उघडपणे फिरत असल्याने त्यांची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गोव्यात तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून त्यात या प्रकाराची भर पडली आहे.

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व क्रूझ जहाज कंपन्यांनी गोमंतकीय खलाशांना माघारी पाठविण्यास सुरू केले आहे. देशभर कर्फ्यू असताना असंख्य खलाशी दाबोळी विमानतळावरून गोव्यात दाखल झाले आहेत. विमानतळावर या खलाशांची तपासणी करण्यात आली होती. त्यांच्या हातावर शिक्का मारलेला असून त्यांना 14 दिवस समाजात मिसळू नये, असे सूचित करण्यात आले आहे. नियमाप्रमाणे या खलाशांना इतर लोकांमध्ये मिसळण्याची परवानगी नसली तरीही नुकतेच गोव्यात उतरलेले खलाशी उघडपणे लोकांमध्ये मिसळत असल्याचे समोर आले आहे. कुडचडे येथे गेल्या तीन दिवसांत चार खलाशी उतरलेले आहेत. सांगेत ब्रिटनमधून दोन कुटुंबे आलेली आहेत. केपेत दहापेक्षा जास्त युवक उतरलेले आहेत. या लोकांना 14 दिवस लोकांमध्ये मिसळू नये, असे सूचित करण्यात आले होते आणि हेच खलाशी आता बाजारात उघडपणे फिरत आहेत. नुकतेच जहाजांवरून उतरलेल्या एका युवकामुळे सांगेत वातावरण तापले होते. कोरोनाची भीती न बाळगता सदर युवक बाजारात फिरत असल्याने गोंधळ मजला होता.सांगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने सांगेतून पलायन केले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात उतरलेल्या खलाशांमुळे पोलिस आणि आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढलेली आहे. सांगे मतदारसंघातील वाडे पंचायत सदस्य संयोगिता गावकर यांनी उपजिल्हाधिकारी तसेच पोलिस स्थानकाला पत्र पाठवून नुकत्याच विदेशातून गोव्यात परतलेल्या सहा जणांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार सर्व सहाजण सध्या वाडे येथे वास्तव्याला आहेत. या विषयी मामलेदार मनोज कोरगावकर यांना विचारले असता सदर पत्राची दखल घेण्यात आलेली आहे. आपण आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा केली असून आणखी दोघेजण विदेशातून परतले आहेत, आणि त्यातील एकाची शोधाशोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, विदेशातून आलेल्या गोमंतकीयांची माहिती मिळताच त्यांची चौकशी केली जात आहे.