होमपेज › Goa › साठ दिवसात १२ कोटी फेडा

साठ दिवसात १२ कोटी फेडा

Published On: Jun 13 2019 1:32AM | Last Updated: Jun 13 2019 1:32AM
मडगाव : प्रतिनिधी

ग्रीन फोमेंतोच्या नव्या भूमिकेमुळे सोनसड्याच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. सोनसड्याच्या बाबतीत पालिकेशी केलेला करार रद्द करून सोनसड्याचा ताबा सोडण्यास ग्रीन फोमेंताने तयारी दर्शवली असली तरी, येत्या साठ दिवसांच्या आत 12.81 कोटी रुपये द्या, अशी अट ग्रीन फोमेंतो ने पालिकेसमोर ठेवलेली आहे. फोमेंतोच्या या भूमिकेमुळे मडगाव नगरपालिकेसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे.

फोमेंतोने पालिलेला पाठवलेल्या टर्मिनेशन नोटीसमध्ये  पालिका शुल्क देत नाही तोपर्यंत सोनसड्याचा ताबा सोडणार नाही. तसेच यंत्रसामुग्री आणि प्रकल्पाचा सुद्धा ताबा सोडणार नाही, असे फोमेंतोने स्पष्ट केले आहे.  गेल्या नऊ वर्षांपासून सोनसड्याचा ताबा फोमेंतोकडे आहे. मडगाव पालिका आणि ग्रीन फोमेंतो यांच्यात कचर्‍यावर प्रक्रिया करण्याबाबत कन्सेशन करार झाला होता. शुल्काच्या विषयावरून दोन्ही पक्षादरम्यान तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी पालिका आणि ग्रीन फोमेंतो यांची नुकतीच संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण नुकतीच ग्रीन फोमेंतोने टोकाची भूमिका घेऊन पालिकेला नोटीस पाठवल्याने पालिकेसमोर अडचण निर्माण झाली आहे.

सोनसड्याचे काम पाहणारे ग्रीन फोमेंतोचे अधिकारी सुदिन रायतुरकर यांनी सांगितले,की   पालिकेला सदर शुल्क भरण्यासाठी साठ दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. पालिकेने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास पुढील कृती करण्यास फोमेंतो समर्थ आहे ,असे ते म्हणाले. पुढील कृती काय असेल, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

पालिका आणि ग्रीन फोमेंतो  यांच्यात झालेला सोनसड्या संबंधीचा कन्सेशन करार पालिकेने फोमेंतोची नोटीस स्वीकारल्याच्या साठ दिवसानंतर रद्द होणार आहे. त्यापूर्वी पालिकेने ग्रीन फोमेंतोला 12.81 कोटी रुपयांचे शुल्क देणे गरजेचे आहे.सदर नोटिशीत ग्रीन फोमेंतोने घन कचरा व्यवस्थापन कायदा 2016 च्या अन्वये पालिकेकडून मिश्र स्वरूपाचा कचरा स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.शिवाय करारानुसार नुकसान भरून काढण्याचे अधिकार फोमेंतोला प्राप्त आहेत, असेही नमूद केले आहे.साठ दिवसात पालिका 12,81,55,137 रुपये भरण्यास अपयशी ठरल्यास, पालिकेला हे शुल्क 12 टक्के व्याजासह भरावे लागणार आहे,अशी ताकीद या नोटीशीतून दिली आहे.

पालिकेकडून वर्गीकरण न करता येणारा कचरा कोणत्याही स्थितीत स्वीकारला जाणार नाही.पालिकेकडून वैद्यकीय कचरा, मृत जनावरे, चिकनचे टाकाऊ अवयव, हाडे तसेच प्लास्टिक कचरा कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून सोनसड्यावर पाठवला जात आहे, असा दावा नोटिसीतून करण्यात आलेला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात फोमेंतोने पालिकेला या संदर्भात नोटीस पाठवली होती.

या विषयी मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक आणि नगराध्यक्षा बबिता आंगले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र  दोघांचेही फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.