पणजी : पुढारी वृत्तसेवा
अव्वल कारकूनपदासाठी कथित बनावट पदवी प्रमाणापत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी रेमंड फर्नांडिस यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, या आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन कारवाई करावी, असे लेखी निर्देश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
अव्वल कारकूनपदासाठी कथित बनावट पदवी प्रमाणापत्र सादर केल्याप्रकरणी रेमंड फर्नांडिस यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करून अॅड. रॉड्रिग्स यांनी 23 जून रोजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची दोनापावला येथील राजभवन येथे जाऊन भेट घेऊन मागणी केली होती.
रेमंड फर्नांडिस हे गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र आहेत.रेमंड फर्नांडिस यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनपदासाठी लखनौ येथील बनावट शिक्षण संस्था असलेल्या भारतीय शिक्षा विद्यापीठाचे 2007 सालचे बी.ए.उत्तीर्णचे बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार अॅड. रॉड्रिग्स यांनी मुख्य सचिवांकडे दाखल केली होती. सदर आरोप चौकशीत सिद्ध झाले होते. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी रेमंड फर्नांडिस यांची अव्वल कारकूनपदी करण्यात आलेली निवड 16 जून रोजी रद्द ठरवली आहे. रेंमड फर्नांडिस यांनी निवड केल्याच्या निर्णयाला 26 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून अंतरीम दिलासा देण्यास नकार दिला.
या प्रकरणातील तक्रारदार अॅड. रॉड्रिग्स यांनी राज्यपाल मलिक यांची भेट घेऊन रेमंड फर्नांडिस यांनीं बनावट पदवी प्रमाणपत्र सादर करुन सरकारची फसवणूक केली आहे. सदर गुन्हा हा दखलपात्र असूनही त्यांच्या विरोधात अद्यापही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,असा दावा केला. रेमंड विरोधात गुन्हा नोंद करावा जेणे करुन भविष्यात अशी कृती अन्य कुणीही करणार नाही, अशी मागणी केली होती. त्यानुसार या मागणीची दखल घेऊन राज्यपालांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांना कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.