Fri, Sep 25, 2020 14:24होमपेज › Goa › गोमेकॉत तीन वर्षांत दीड हजार ‘ओपन हार्ट’शस्त्रक्रीया

गोमेकॉत तीन वर्षांत दीड हजार ‘ओपन हार्ट’शस्त्रक्रीया

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:52PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात  (गोमेकॉ) मागील तीन वर्षांत एकूण दीड हजार ‘ओपन हार्ट’  शस्त्रक्रीया व पाचशे हृदयरोगविषयक अन्य शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी बुधवारी दिली. 

गोमेकॉच्या ‘पोस्ट ऑपरेशन’ अतिदक्षता विभागात रुग्णांसाठी बुधवारी पाच नव्या खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली. या विभागातील एकूण खाटांची संख्या आता 13 झाली आहे. उद्योगपती नारायण बांदेकर यांनी या विभागातील संपूर्ण सुविधा ‘मंदा आणि नारायण बांदेकर चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे पुरस्कृत केली आहे.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष बोरकर म्हणाले, की गोव्यात पोर्तुगीज राजवटीत सुरू केलेले गोमेकॉ इस्पितळ आशिया खंडातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे. देशातील कोणत्याही सरकारी रुग्णालयात मिळत नसलेल्या अद्ययावत सुविधा या सरकारी इस्पितळात आहेत. त्यामुळे शेजारील राज्यांतूनही रुग्ण येेथे उपचार घेण्यासाठी येतात.

तीन वर्षांपूर्वी गोमेकॉ इस्पितळात  हृदयरोग शस्त्रक्रीयांचा सुपरस्पेशालिटी विभाग सुरू झाला. रुग्णांची संख्या वाढल्याने प्रतीक्षा यादी वाढत आहे. दीड महिना रुग्णांना प्रतीक्षेत रहावे लागते. यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी दीड महिन्यांवरून एक महिन्यापर्यंत कमी होईल, असे गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी सांगितले.  हृदयरोगविषयक पदवी शिक्षणाचा अभ्यासक्रम येत्या वर्षांपासून गोमेकॉत सुरू केला जाईल, असे ते म्हणाले. गोमेकॉचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी विचार व्यक्‍त केले. कार्यक्रमास आरोग्य खात्याचे अवर सचिव डॉ. राजेंद्र देसाई, अवर सचिव तृप्‍ती मणेरकर, प्रशासन संचालक दत्‍ताराम सरदेसाई व अन्य डॉक्टर्स  उपस्थित होते.

राज्यात पाच कार्डियाक रुग्णवाहिका

राज्यात हृदयरोगाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर तातडीने प्राथमिक उपचार  व्हावेत, यासाठी राज्यात पाच ठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका तैनात केल्या जातील. या रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी एक  हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्‍ती केली जाईल. गोव्यात असे डॉक्टर मिळत नसल्याने परराज्यातून डॉक्टर आणले जातील, अशी माहिती आरोग्य  मंत्री राणे यांनी दिली.