Tue, Jun 15, 2021 12:06
गोमेकॉची संयुक्‍त औषध खरेदी समिती बरखास्त?

Last Updated: Jun 14 2021 2:38AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या संकटात आपत्कालीन खरेदीचे सर्व हक्क संयुक्‍त खरेदी समितीला दिले होते. ती समितीच आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बरखास्त करून आरोग्य खात्याच्या मनमानीला वेसण घातली आहे. समिती बरखास्त केल्याचे पत्रक राज्य सरकारचे अतिरिक्‍त संयुक्‍त सचिव विकास गावणेकर यांच्या सहीनिशी जारी करण्यात आले आहे. हा निर्णय आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना हा धक्का असल्याची चर्चा आता भाजप गोटात सुरू झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, रुग्णांवर उपचार त्वरित व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, साहित्य खरेदीसाठी आरोग्य खात्याने संयुक्त खरेदी समिती नेमली होती.आयव्हर्मेक्टिनच्या खरेदीवर विरोधकांनी उठवलेला आवाज आणि इतर व्यवहारावर टाकलेल्या प्रकाशामुळे ही समिती चर्चेत आली होती. मुख्यमंत्र्यांनी अखेर या समितीचे हक्क काढून घेतले आहेत. पूर्वी या समितीला अर्थ खात्याची कोणतीही परवानगी लागत नव्हती, त्यामुळे जे व्यवहार झाले ते संशयास्पद असल्याचे वाटत असावेत, अशीही चर्चा आहे.

राज्य सरकारने जे परिपत्रक काढले आहे, त्यानुसार आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील वित्त विभागाकडून मान्यता घेतल्याशिवाय कोरोना विषयक साहित्याची खरेदी करता येणार नाही. भारत सरकारच्या अधिकृत पोर्टल जीईएम मार्फत खरेदी करावी, आवश्यक साहित्य ते त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर खुल्या बाजारातून घ्यावे,असे नमूद केले आहे.