होमपेज › Goa › गोवा प्लास्टिक कचरामुक्त करण्याचे ध्येय : मुख्यमंत्री

गोवा प्लास्टिक कचरामुक्त करण्याचे ध्येय : मुख्यमंत्री

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:33AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारने गोवा राज्य प्लास्टिक कचरा मुक्‍त करण्याचे ध्येय ठेवले आहे. दि. 30 मे 2018 पर्यंत हे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी कळंगुट येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळंगुट पंचायतीस कचरावाहू ट्रक दिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 

पर्रीकर म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपणार्‍या संस्थांच्या सहकार्याने पंचायती व संघटनांनी कचरा समस्या पूर्णपणे संपुष्टात यावी, यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. सरकार  गोवा राज्य प्लास्टिक कचरा मुक्‍त करण्यास कटिबध्द  आहे. सरकारच्या या अभियानास लोकांनी सहकार्य करून प्लास्टिकला पर्याय  असलेल्या कागदी व कापडी पिशव्यांचा वापर  करण्याची सवय लावून घ्यावी.

उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले,  कळंगुट व परिसरातील कचरा कळंगुट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यासाठी या ट्रकचा वापर केला जाईल. कळंगुट येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात सध्या प्रतिदिन 150 टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. याव्दारे हरित ऊर्जा निर्माण होत असल्याचे त्यांनी  सांगितले.

गेरा डेव्हलपमेंट प्रा.लिमिटेडतर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत (सीएसआर) कळंगुट परिसरात कचरा गोळा करण्यासाठी पर्रा सिटीझन फोरमतर्फे हे कचरावाहू ट्रक देण्यात आले. कार्यक्रमास महसूलमंत्री रोहन खंवटे, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर, पर्रा सरपंच डिलायला लोबो, पर्रा सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर, गेराचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.