Thu, Jul 09, 2020 22:33होमपेज › Goa › शिवोलीत अकरा लाखांची चोरी; चार विदेशी नागरिकांना अटक

शिवोलीत अकरा लाखांची चोरी; चार विदेशी नागरिकांना अटक

Published On: Mar 15 2019 1:44AM | Last Updated: Mar 15 2019 12:59AM
म्हापसा : प्रतिनिधी  

शिवोली बामणवाडा येथील श्रीमती मारिया इझाबेला फर्नांडिस हिच्या घराच्या मागील दाराची कडी तोडून चोरट्यांनी रोख 3 लाख रुपये व सुवर्णालंकार मिळून 11 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी चार जॉर्जीयन नागरिकांना  पकडून त्यांच्याकडून 3 लाख रोख व 6 लाखांचे सुवर्णालंकार हस्तगत केले. त्यांनी चोरीसाठी वापरलेले साहित्य व भाड्याची कार ताब्यात घेतली असून चारही जणांना अटक केल्याची माहिती हणजूण पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. अटक केलेल्या   चोरट्यांची नावे कॉस्टांटीन चखाइदझे (वय 46), लुरा पिरवेली (42), लाशा गुरचियानी (46) व इराक्लो तामलीयानी (33) अशी असल्याचे  देसाई यांनी सांगितले. सदर चोरी दि. 11 रोजी सांयकाळी 6.30 ते 9.30 या दरम्यान झाली होती.

चोरट्यांनी मागील दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे खोलून आतील रोख रक्कम व सुवर्णालंकार लांबवले होते. तक्रारदाराच्या घरासमोरील रस्त्यापलिकडील इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजवरून चोरीसाठी वापरलेली मरून रंगाची कार जी 03 डब्लू 3016 दिसल्याने पोलिसांनी या रेंट अ कार  मालकाला बोलावून त्याच्या ग्राहकांची माहिती मिळवली. सदर चोरटे हडफडे येथे एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर राहात होते. त्यांच्यावर पाळत ठेवून पोलिसांनी शिताफीने त्यांना अटक केली. त्यांच्याकडील सर्व साहित्य हस्तगत केल्यावर त्यांनी जवळच्या शेतजमिनीत पुरून ठेवलेले सुवर्णालंकारही हस्तगत केले.

चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या ऐवजात 3 लाख रूपये रोख, 3 कंठहार, 12 जोड कर्णफुले, अंगठी, गोल्ड प्लेटेड पैंजण जोडी, तीन बांगड्या, दोन पिवळ्या रंगाचे कडे व विरघळलेले काळ्या रंगाचे सोने या दागिन्यांचा समावेश आहे. शिवाय एक हुंडाय आय टेन कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.    

निरीक्षक नवलेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विश्‍वजित चोडणकर, तेजसकुमार नाईक, महिला उपनिरीक्षक मनीषा पेडणेकर, शिपाई विशाल नाईक, सुहास जोशी, सत्येंद्र नास्नोडकर, अनंत च्यारी, रूपेय मठकर, तीर्थराज म्हामल, जतीन शेटये, गोदिश गोलतेकर, संजय गावडे, आदर्श नागवेकर यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी भाषा अनुवादक आणून संशयितांची चौकशी केली. संशयितांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.