Tue, Jun 15, 2021 11:46होमपेज › Goa › कुमठोळ येथे घराला आग; दहा लाखांची हानी

कुमठोळ येथे घराला आग; दहा लाखांची हानी

Published On: Apr 25 2018 2:37AM | Last Updated: Apr 25 2018 2:36AMवाळपई : प्रतिनिधी

गॅस गळतीनंतर शॉर्टसर्किट होऊन  सोमवारी रात्री लागलेल्या आगीत कुमठोळ सत्तरी येथील नारायण केरकर यांचे संपूर्ण घर  भस्मसात झाले. सुमारे दहा लाखांची हानी झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

घरातील मंडळींनी प्रसंगावधान राखून बाहेर पळ काढल्याने ते बचावले. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तातडीने केलेल्या कारवाईत सुमारे एक लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले असले तरी संपूर्ण घर जळून बेचिराख झाल्याने केरकर कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

केरकर यांनी सांगितले की, आपण कामाला गेलो होतो व रात्री आपली पत्नी व मुलगी घरामध्ये झोपले असता आगीचा प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान राखून पत्नी मुलीसह घरातून बाहेर पडल्याने बचावल्या. मात्र, घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने, दीड लाख रुपये रोकड, फ्रीज, टीव्ही, शिलाई मशीन, कपडे, भांडी तसेच इतर साहित्य जळून खाक झाले.
अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे एक लाखाची मालमत्ता वाचविली. मात्र, आगीचा भडका एवढा होता की, घरातील आणखी मालमत्ता वाचवता आली नाही, अशी माहिती वाळपई अग्निशामक दलाचे निरीक्षक श्रीपाद गावस यांनी दिली. 

दरम्यान, इंडेन गॅस एजन्सीचे मालक परेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपण  घटनास्थळी भेट देऊन  पाहणी केली असून सिलिंडरमध्ये एका ठिकाणी पडलेल्या भेगेतून गॅस गळती झाली असून याबाबतचा अहवाल आपण कंपनीला सादर करणार आहोत. तसेच सदर कुटुंबाला कंपनीच्या माध्यमातून शक्य तेवढी नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.