Tue, Jul 07, 2020 18:11होमपेज › Goa › अतिरिक्त कालावधीत मद्यविक्रीला बंदी

अतिरिक्त कालावधीत मद्यविक्रीला बंदी

Published On: Apr 06 2019 1:45AM | Last Updated: Apr 06 2019 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्याच्या सीमावर्ती भागात अर्थात काणकोण-पोळे तसेच सुर्ला-साखळी भागात मद्यविक्रीवर 16 ते 18 एप्रिल या अतिरिक्त कालावधीत बंदी लागू करणारा आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 21 ते 23 एप्रिल या कालावधीत मद्यविक्रीला पूर्णतः बंदी लागू करण्यात आली होती. नव्या आदेशानुसार मात्र राज्यालगतच्या     सीमावर्ती भागात मद्यविक्रीवर तीन दिवसांची  अतिरिक्त बंदी घालण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष, शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने गोव्यात  सर्व मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांना 20 एप्रिलपर्यंत दररोज रात्री 11 वाजेपर्यंतच मद्य विक्री आणि मद्यपान करण्यास मुभा देणारा आदेश काढला होता. त्यात आता कर्नाटक राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 16 ते 18 एप्रिल या कालावधीत गोवा राज्यातून मद्याची परराज्यात निर्यात करण्यास वा राज्यात मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

कर्नाटक सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्ला आणि कारवार सीमेलगत 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण तालुक्यातील पोळे आणि लोलये परिसरातील सर्व दारू विक्रीची आस्थापने 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 18 एप्रिल  रोजी सं. 6 वाजेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहेत. याशिवाय, सुर्ला, पोळे, लोलये भागातील मद्यविक्री 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 23 एप्रिल  रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी 23 मे रोजी बंद ठेवण्याचा आदेश शुक्रवारी काढण्यात आला. 

बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेल्या आस्थापनाला केवळ अन्नपदार्थ विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र,  अशा आस्थापनांनी ‘विक्रीस मद्य उपलब्ध नाही’ असा फलक लावावा लागेल, अशी सूचनाही आयोगाने केली आहे.