Mon, Nov 30, 2020 14:11होमपेज › Goa › पेडणे- केरीत 1 कोटीचे ड्रग्ज जप्त

पेडणे- केरीत 1 कोटीचे ड्रग्ज जप्त

Last Updated: Oct 20 2020 1:29AM

पेडणे : अटक केलेल्या संशयितांसमवेत पोलिस निरीक्षक जीवबा दळवी आणि इतर पोलिस कर्मचारी. (छाया : मकबूल माळगीमनी)पेडणे : पुढारी वृत्तसेवा

पेडणे तालुक्यातील केरी येथे पेडणे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने सोमवारी    ड्रग्जविरोधी केलेल्या कारवाईत चरस, गांजा आणि ड्रग्ज निर्मितीसाठी लागणार्‍या वनस्पतींसह तब्बल 1 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.  या कारवाईत रमा केरकर (22) , रश्मी केरकर, (44 )आणि शिवाजी केरकर  (34 ) या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. 
अडीच किलोची गांजाची झाडे  जप्त करण्यात आली असून त्याची  किंमत जवळपास पाच लाख इतकी असल्याचे सांगण्यात आले. तर 1 किलो 300 ग्रॅमपेक्षा जास्त सुका गांजाही जप्त करण्यात आला आहे. एक लाख तीस हजार किंमतीचा हा गांजा असल्याचे सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे अडीच किलोपेक्षा जास्त वजनाचे चरस जप्त करण्यात आले. ज्याची किंमत एक कोटी दोन लाख वीस हजार इतकी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पेडण्यातील केरीमध्ये ड्रग्जचे उत्पादन होत असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पेडणे पोलिसांनी ही कारवाई केली.  ड्रग्ज उत्पादन करणार्‍यांना रंगेहाथ पकडले. या कारवाई ड्रग्जसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून  सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. केरी भागातील रमा केरकर याच्या थोरलेबाद येथील घराच्या टेरेसवर गांजा, चरसची शेती केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. 

 सदर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्त्वाखाली   पोलिस उपनिरीक्षक  संजीत कानोलकर, पोलिस उपनिरीक्षक  हरीश वैगुनकर, पोलिस    उपनिरीक्षक विवेक हळदणकर, कॉन्स्टेबल विनोद पेडणेकर,  रवी मालोजी,  अनिशकुमार पोके,  यशदीप उमगेकर, कॉन्स्टेबल जीवन गोवेकर, महेश नाईक, उदय गोसावी, मिथिल परब,  भास्कर चारी,  महिला  कॉन्स्टेबल स्मिता गावस, महिला हेड कॉन्स्टेबल तृप्ती सातोस्कर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

अटक केलेल्या  तिघांविरोधात  एनडीपीएस  कायद्याच्या कलम 29 अंतर्गत 20(ए)(1), 20(बी)(2),20 (बी)अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पोलिस अधीक्षक उत्क्रिष्ट प्रसून,पोलिस उपअधीक्षक  गजानंद प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलिस अधिक तपास करत आहेत.

ड्रग्ज प्रकरणी मुख्य संशयित मोकाटच?

ड्रग्ज प्रकरणात गुंतलेला मुख्य संशयित पेडणे पोलिसांच्या या कारवाईपासून अलिप्त असल्याची चर्चा  दिवसभर केरी गावात  सुरू होती.  मुख्य संशयित आजारी असल्याने त्याला  हॉस्पिटलमध्ये 18 रोजी रुग्णवाहिकेतून हलवण्यात आल्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे.  दरम्यान, 5 रोजी पेडणे पोलिसांनी गावडे वाडा मांद्रे येथे अशीच कारवाई करून गांजाची 3 लाखांची झाडे जप्‍त केली होती.