Mon, Sep 21, 2020 18:29होमपेज › Goa › जि. पं. निवडणूक पुढे ढकला : सुदिन ढवळीकर 

जि. पं. निवडणूक पुढे ढकला : सुदिन ढवळीकर 

Last Updated: Feb 16 2020 1:47AM

आमदार सुदिन ढवळीकरपणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात दहावीची परीक्षा 20 एप्रिलपर्यंत चालणार असून दोन्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकींचा विद्यार्थ्यांना त्रास होणार असल्याने जिल्हा पंचायत निवडणुका पुढे ढकलाव्यात. सदर निवडणुकांसाठी मतदारसंघाचे आरक्षण चार दिवसांत जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी सांत इनेज येथील पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

ढवळीकर म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीचा राज्य सरकारने घोळ घातला असून आतापर्यंत निवडणुकीच्या तारखा दोन वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. आधी 15 मार्च व त्यानंतर 22 मार्च अशा निवडणूक तारखा सरकारने अधिसूचित केल्या आहेत. राज्यात आता कार्निव्हल आणि शिगमोत्सव साजरा होणार असून दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. या परीक्षा 20 एप्रिलला संपणार आहेत. 

विद्यार्थ्यांना होऊ शकणार्‍या त्रासाचा विचार करून जिल्हा  पंचायत निवडणुकांचे वेळापत्रक नव्याने ठरवावे, अशी मगोची मागणी आहे. या निवडणुकीसाठी कुठले मतदारसंघ आरक्षित करण्यात आले आहेत, याची माहिती न दिल्याने अन्य राजकीय पक्ष निवडणुकीसाठी तयारी करू शकत नाहीत. सदर आरक्षण राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार की पंचायत खाते करणार हे सरकारने अजूनही उघड केलेले नाही. आयोगाने आरक्षणाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असल्याचे जाहीर केले असून आरक्षणाबाबतीत सरकार दिरंगाई करत आहे. यासाठी चार दिवसांत आरक्षण जाहीर करावे, अशी मगो पक्षाची मागणी आहे.

म्हादई ही गोमंतकीयांची जीवनदायिनी असून याविषयी जागृती करण्याचे मगोतर्फे प्रयत्न केले जात आहेत. मगोतर्फे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढण्याचे निश्‍चिीत केले होते. मात्र, अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्यामुळे सदर आंदोलन पुढे ढकलण्यात आले. आता येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारविरूद्ध विधानसभेवर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. याशिवाय, येत्या मे महिन्यात पणजी शहरात म्हादईप्रश्‍नी जनजागृती करण्यासाठी मेणबत्ती मोर्चाही आयोजित केला जाणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. 

सरकारचा ‘रात्रीस खेळ चाले’ : ढवळीकर

राज्य सरकारचा ‘रात्रीस खेळ चाले’चा प्रयोग सुरू आहे. सरकारने मगोचे दोन आमदार रात्रीच फोडले, मंत्रिपदेही रात्रीच जाहीर केली. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी आमदार खंवटेंच्या अटकेच्या विरोधात सभात्याग केल्याने सरकारने ‘सार्वजनिक विद्यापीठ विधेयक’ आणि ‘वाहतूक कायदा दुरुस्ती विधेयक’ सभागृहात एकतर्फी मंजूर करून घेतले. ही दोन्ही विधेयके राज्याला धोकादायक ठरणार आहेत. अर्थसंकल्पात सरकार फक्‍त आकड्यांचा खेळ करत असून मागील अर्थसंकल्पातील फक्‍त 33 टक्क्यांपर्यंत निधीचा वापर करण्यात आला असून अन्य निधी सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन, मागील कर्जाचे हफ्ते चुकविणे यामध्येच गेले असल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला. 

 "