Sat, Sep 19, 2020 12:11होमपेज › Goa › शाळा २१ पासून सुरू करण्यावर मतभिन्‍नता; मंत्री, आमदारांत  नाखुशी

शाळा २१ पासून सुरू करण्यावर मतभिन्‍नता; मंत्री, आमदारांत  नाखुशी

Last Updated: Sep 18 2020 1:47AM
पणजी :  पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील शाळा 21 सप्टेंबरनंतर मर्यादित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यातील शिक्षक, पालक तसेच सरकारातील काही मंत्री - आमदार या निर्णयाबाबत नाखूश आहेत. शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक-शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापनांना सरकार विश्‍वासात घेणार असून यासंबंधी (आज) गुरुवारी सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे. मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या बैठकीत सर्व घटकांशी संवाद साधणार आहेत.  

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात  राज्य सरकार राज्यातील 9 वी आणि 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे जाहीर केले होते.  राज्य शिक्षण संचालनालयानेही सर्व पालक आणि शिक्षकांसोबत  ऑनलाईन चर्चा करण्याचे निश्‍चित केले असले तरी या आठवड्यातील अवघे तीन दिवसच बाकी असल्याने सदर चर्चा होणार कधी, आणि निर्णय जाहीर होणार कधी, याविषयी पालक आणि शिक्षकांमध्ये साशंकता  आहे. 

बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. लोबो म्हणाले, की सध्या कोरोना संक्रमणात झालेली वाढ आणि वाढती कोरोनाबाधितांची संख्या  पाहता शाळा सुरू करणे चुकीचे असल्याचे आपले मत आहे. या काळात शाळा वा वर्ग सुरू न करणेच संयुक्तीक ठरेल. 

पणजीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले, की केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शाळेतील काम करण्याच्या आणि शिक्षणासाठी वापरल्या जात असलेल्या सर्व जागांची साफसफाई करणे आणि निजर्ंतुकीकरण करणे ही कामे नियमित करावी लागणार आहेत. सर्व शाळांमध्ये अशी सोय करणे अथवा त्यासाठी वेळ, पैसा खर्च करणे शक्य आहे का, हा प्रश्‍न असून तो सरकारने विचारात घेतला पाहिजे. 

एका उच्च माध्यमिक शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले, की सरकार एका बाजूने ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यास आणि त्यासाठी सर्व तयारी करून घेतली असताना अचानक त्यात बदल कसा काय घडवू शकते. शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत येण्यास मान्यता दिली असून त्यासाठी पालकांकडून लेखी परवानगी  घेतली गेली आहे.  हे सर्व निर्णय  परस्पर विरोध निर्माण करणारे असून विद्यार्थ्यांना घरात बसूनच शिक्षण घेण्यास प्रवृत करणारे आहेत. कोरोनाच्या काळात, घाईघाईने शाळा सुरू करण्यामागील हेतू काय हे सरकारने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. 

पणजीतील एका पालकाने नाव न  प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले, की आमच्या घरात वयस्क  आणि आजारी माणसे आहेत. शाळा सुरू झाल्यावर आमच्याच मुलांकडून कोरोनाचा प्रसार होऊन ज्येष्ठ सदस्यांना बाधा होण्याची भीती असल्याने आम्ही मुलांना शाळेत पाठवू शकत नाही.

सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन व्हावे : पिसुर्लेकर

गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनंत पिसुर्लेकर म्हणाले, की संघटनेचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा असणार आहे. शाळेत जाण्याचा निर्णय ऐच्छिक असून ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात अडचणींचा सामना करावा लागत असेल, त्यांनी शाळेत संबंधित शिक्षकांना भेटून मन मोकळे करण्याची ही संधी आहे. अर्थात शाळेत सर्वांनीच केंद्र सरकारच्या सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. 

 "