होमपेज › Goa › नेहरूंमुळे गोवामुक्‍तीला विलंब

नेहरूंमुळे गोवामुक्‍तीला विलंब

Last Updated: Jan 15 2020 1:43AM
पणजी : प्रतिनिधी
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर गोवा मुक्‍त व्हायला 14 वर्षे गेली, हे गोमंतकीयांचे दुर्दैवच आहे. गोव्याला 14  वर्षे स्वातंत्र्यासाठी थांबावे लागले. राज्याला उशिरा स्वातंत्र्य मिळण्याला तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. पंडित नेहरूंना जर गोमंतकीयांची काळजी असती किंवा गोवा मुक्‍त व्हावा, असे वाटले असते तर गोव्याला 14 वर्षे वाट पाहावी लागली नसती, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. 

पणजीतील कांपाल मैदानावर 72 व्या सैन्य दिनानिमित्त आयोजित ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याच्या समारोप सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून मुख्यमंत्री सावंत बोलत होते. समारोप कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, ब्रिगेडिअर संजय रावल आणि अ‍ॅडमिरल फिलीपोज मॅथ्यू उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 1950 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यघटना तयार झाली. 1947 मध्ये नाही तर किमान 1950 मध्ये तरी जवाहरलाल नेहरू यांनी गोमंतकीयांचा विचार करायला हवा होता. ज्यावेळी भारतीय सैन्य व गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकांकडून नेहरूंवर गोवा मुक्‍तीसंदर्भात दबाव घालण्यात आला त्यावेळी राज्यात सैन्य पाठविण्यात आले. त्यामुळे समस्त सैन्य दलाचे गोमंतकीय कायम आभारी राहतील, असेही सावंत यांनी सांगितले.

भारतीय सैन्य दलाच्या प्रत्येक श्‍वासात देशभक्ती आहे. सामान्य नागरिकांमध्येदेखील अशा प्रकारची देशभक्ती रुजविणे आवश्यक आहे. त्यामुळे सैन्य दलासाठी ज्याप्रकारे प्रशिक्षण दिले जाते तसे सामान्य नागरिकांनाही दिले जावे, असे वाटते. या प्रशिक्षणातून सर्वांमध्ये देशभक्ती रुजू शकते. सामान्य नागरिकांत आज देशभक्ती कुठे तरी कमी पडत आहे, अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे आणखी सैन्य मेळावे आयोजित करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

राज्यातील तरूणांना सैन्याची अधिक माहिती मिळावी यासाठी प्रत्येक तालुक्यात मेळावा आयोजित केला पाहिजे. शिवाय यंदा भारतीय लष्करभरती गोव्यातच व्हावी म्हणून संरक्षण राज्य मंत्री प्रयत्न करत आहेत. येथील युवकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सावंत यांनी यावेळी केले. 

मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, गोमंतकीय युवकांना सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण मंत्री नाईक यांनी काढली. सर्जिकल स्ट्राईकच्या रुपात सैन्याने आपली ताकद जगाला दाखवून दिल्याचे ते म्हणाले. भारतीय सेना जगात सर्वोत्तम आहे. केवळ युद्धजन्य परिस्थितीत नाही तर नैसर्गिक आपत्तीमध्येही सैन्यदल बचाव आणि मदतकार्यासाठी अग्रेसर असते. देशातल्या 35 जिल्ह्यांमध्ये यावर्षी पुराने थैमान घातले होते, सैन्यदलाने 45,000 नागरिकांचे प्राण वाचवले. सैन्याच्या कामगिरीने नेहमीच देशाचा गौरव वाढविला आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यातील तरुणांना लष्कराविषयी माहिती मिळावी, प्रेरणा मिळावी या उद्देशाने भारतीय सैन्याने या मेळाव्याचे आयोजन केले होते. अतिशय नेटके संचलन, मिलिटरी आणि पाईप बँड प्रदर्शन, मधुर बँड, हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर उपस्थित नागरिक भारावून गेले होते.