होमपेज › Goa › ‘दीनदयाळ योजने’साठी नव्याने निविदा प्रक्रिया : बाळकृष्ण पै

‘दीनदयाळ योजने’साठी नव्याने निविदा प्रक्रिया : बाळकृष्ण पै

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:29AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत यशस्वी ठरलेली   ‘दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना’ नव्या स्वरूपात  आणण्याची तयारी आरोग्य खात्याने सुरू केली आहे. यासाठी सदर योजनेचे कंत्राट नव्याने देण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे, अशी माहिती योजनेचे सल्लागार बाळकृष्ण पै यांनी दिली. 

‘दीनदयाळ स्वास्थ विमा’ योजनेला  सप्टेंबर -2016 मध्ये प्रारंभ करण्यात आला असून युनायटेड इंडिया विमा कंपनीला सदर योजना चालवण्यासाठी कंत्राट मिळाले होते. कंपनीला दिलेल्या कंत्राटाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे.  यामुळे नव्याने कंत्राट देण्याबाबतची प्रक्रिया सरकारने सुरू केली असल्याचे पै यांनी सांगितले. 

राज्य सरकारने सदर ‘दीनदयाळ’  योजनेची पुनर्रचना करण्याचे निश्‍चित केले असून त्यात सुमारे 460 उपचारांचा समावेश केला जाणार आहे. सध्या या योजनेत 447 विकारांवरील उपचारांचा समावेश असून त्यात अनेक सुधारणा व दुरूस्त्या करण्याच्या सूचना जनतेकडून आल्या आहेत.  या सुधारणांचा योजनेत समावेश करण्यासाठी नव्याने कंत्राट देण्याचे ठरविण्यात आले आहे, असे  पै यांनी सांगितले. 

पै म्हणाले की, राज्यातील सुमारे 2.20 लाख कुटुंबांनी या योजनेत आपल्या सहभागाची नोंदणी केली असून त्यांना  कार्ड वितरणही करण्यात आले आहे. नव्या विमा कंपनीकडे किमान तीन वर्षांसाठी सदर योजनेचे  कंत्राट  देण्याची अट करारात घालण्यात येणार आहे. या योजनेत सध्या राज्यातील 38 आणि परराज्यांतील 9 मिळून एकूण 47 इस्पितळांना सामावून घेण्यात आले आहे. या संख्येत आणखी काही इस्पितळे जोडण्यात येणार असल्याचे पै म्हणाले.