Sun, May 31, 2020 17:47होमपेज › Goa › ठरावात दुरुस्ती करा, अन्यथा अविश्वास

ठरावात दुरुस्ती करा, अन्यथा अविश्वास

Last Updated: Nov 08 2019 11:47PM

पत्रकार परिषदेत बोलतांना नगरसेवक आर्थर डिसिल्वा, रुपेश महात्मे, डोरिस टेक्सेरा, राजू शिरोडकर व इतर.मडगाव : प्रतिनिधी

जनमत कौल चौकात कोंकणीचे जनक डॉ जॅक सिक्वेरा यांचा पुतळा बसवण्याचा ठराव घेताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. शिवाय इतिवृत्तांतात तो ठराव समाविष्ट करून मंजुरीसाठी आणण्यात आल्याने नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी कामकाजाच्या 48 तासांच्या आत त्या ठरावात दुरुस्ती करावी तसेच मडगाव पालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या नामकरणाचा विषय स्थगित ठेवावा अन्यथा त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जाणार आहे असा इशारा बारा नगरसेवकांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

आम्ही डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याच्या विरोधात नाही. सिक्वेरा यांचा पुतळा बसवण्यासाठी कायदेशीर सोपस्कर करणे आवश्यक होते. नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचा विषयाचा खास मुद्दा बैठकीत मांडणे गरजेचे होते. त्यांनी बैठकीत सर्व साधारण मुद्द्यांवर चर्चा करतांना हा विषय मांडला होता आणि नगरसेवकांनी त्या ठरावाला विरोध सुद्धा केला होता. पण इतिवृत्तांतात तो ठराव मंजूर झाल्याचे दाखवल्याने सर्वांनाच धक्का बसल्याचे नगरसेवक आर्थर डिसिल्वा म्हणाले. खुद्द माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव मडगावातील रस्त्याला देण्याची मागणी होती.पण नंतर आम्ही सर्व प्रस्तावा बरोबर हाही प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी केली होती असे रुपेश महात्मे म्हणाले. नगराध्यक्षा आंगले यांनी कामकाजाच्या 48 तासांच्या आत ठरावात दुरुस्ती करावी अन्यथा राजीनामा द्यावा.आंगले यांनी 48 तासांच्या आत ठरावात दुरुस्ती न केल्यास त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला जाईल अशी माहिती नगरसेविका डोरिस टेक्सेरा यांनी दिली.

ठरावात चोरी छुपे बदल  करण्याचा प्रकार सुरू आहे.नगरसेवकांनी प्रत्येक वेळा त्याकडे दुर्लक्ष केले होते.पण आता अती होऊ लागले आहे.पालिकेच्या इतिहासात कधीच ठरावात बदल झाले नव्हते.हे प्रकार आता सर्रासपणे घडू लागले आहेत .गुरुवारी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत नगरसेविका डोरिस टेक्सेरा यांनी ठरावात झालेल्या बदलावर आवाज उठवला होता.पण आमच्याच सहकारी नगरसेवकांनी त्यांना विरोध करून गप्प राहण्यास भाग पाडले अशी खंत डिसिल्वा यांनी व्यक्त केली.पालिकेच्या तिजोरीत असलेला करदात्यांचा पैसा संपवण्याचा काहीजणांचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

डोरिस टेक्सेरा यांनी यावेळी बोलतांना चोरीछुपे ठरावात बदल घडवण्याचे प्रकार यापूर्वी पालिकेत कधीच घडले नव्हते असे सांगितले.डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याला आपला विरोध नाही पण चोरीछुपे ठराव बदलण्याची कोणालाच अवश्यकता नव्हती. आपण बैठकीत पालिका मंडळाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचा प्रयत्न केला असता आपल्याला गप्प राहण्याचे सूचित करण्यात आले असे डोरिस म्हणाल्या. नगराध्यक्षा बबिता आंगले यांना जनमत कौल सर्कल वर डॉ जॅक सिक्वेरा यांचा पुतळा बसवायचा असेल तर त्यांनी त्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबवयाला हवा होता. रीतसर ठराव घेऊन तो मंजूरी साठी सरकार दरबारी पाठवायची आवश्यकता होती. असे न करता चोरीछुपे ठरावात बदल करण्यात आला आणि आता खोटारडेपणा उघडकिला येऊन सुद्धा बबिता आंगले तो ठराव बदलण्यास तयार नाहीत असे डोरीस म्हणाल्या.प्रत्येक बैठकीत घेतले जाणारे ठराव आपोआप बदलले जातात. दर बैठकीत या प्रकारावरून खंडाजंगी माजते. पण आता या गोष्टी सहन शक्तीच्या पलीकडे गेल्या आहेत, अशी टीका डोरीस टेक्सेरा यांनी केली आहे.

जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्या विषयीच्या ठरावाला नगरसेवक आर्थर डिसिल्वा यांनी समर्थन दिलेच नव्हते.पण इतिवृत्तांतात मात्र त्यांनी ठरावाला समर्थन दिल्याचे नोंद आहे.या प्रकारारून ठराव कशा प्रकारे बदलले जातात हे स्पष्ट होत आहे असे डोरिस म्हणाल्या. नगराध्यक्षा बबिता आंगले यांना अश्याच प्रकारे ठराव बदलायचे असेल तर बैठक घेण्याची काय आवश्यकता आहे. बैठका न घेता हवे ते ठरावं घेऊन टाका, असेही त्या म्हणाल्या. नगराध्यक्षा आंगले यांनी येत्या 48 तासात इतिवृत्तातात दुरुस्ती करावी आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून सदर प्रस्ताव सरकार दरबारी मंजुरी साठी पाठवावा. हे जमत नसल्यास त्यांनी नगराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे असे आवाहन डोरिस यांनी केले आहे. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा पालिका निधीतून उभारण्यास डोरिस आणि आर्थर यांनी विरोध केला आहे.मुख्याधिकरी सिद्धिविनायक नाईक हे कर दात्यांकडून कराची वसुली करत आहेत.महसुलाच्या पैसा पुतळ्यांच्या उभारणीसाठी खर्च केला जाऊ नये असे डोरिस म्हणाल्या.

शुक्रवारी बारा नगरसेवकांनी पालिका मंडळाच्या बैठकिवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे सदस्यांची गणपूर्ती न होता मुख्याधिकार्‍यांनी तशीच बैठक पुढे नेऊन विविध विषयांचे ठराव मंजूर करुन घेतले. शिवाय इतिवृत्तांतात ते कन्फर्म करून टाकले. या कृतीला न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. भाजपचे नगरसेवक रुपेश महात्मे यांनी यावेळी बोलताना जॅक सिक्वेरा यांचा पुतळा बसवण्यास आपला विरोध नाही पण त्यासाठी नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी कायदेशीर सोपस्कर अवलंबण्याची आवश्यकता होती असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी जागा किंवा सार्वजनीक ठिकाणी पुतळे उभारता येणार नाहीत. जॅक सिक्वेरा हे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते.त्यामुळे सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करूनच हा पुतळा बसवण्याची आवश्यकता होती.भविष्यात कोणी आरटीआयच्या माध्यमातुन चौकशी केल्यास हा पुतळा काढावा लागू नये असा आमचा हेतू आहे असे महात्मे म्हणाले.

   बदलण्यात  आलेला ठराव दुरुस्त करावा, ताबडतोब पालिका मंडळाची बैठक घ्यावी तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची समिती नेमून पुतळा बसवण्याच्या आणि रस्त्यांच्या नामकरणाच्या विषयाचा अभ्यास कारुन पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.