होमपेज › Goa › गोव्यात आणखी तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू 

गोव्यात आणखी तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू 

Last Updated: Jul 13 2020 1:35PM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा राज्यात कोरोनाचे बळी वाढत असून, सतत तिसर्‍या दिवशी सोमवारीही आणखी तीन कोरोना बाधितांचे मृत्यू झाले. मांगोरहिल येथील ‘कटेंन्मेंट झोन’मध्ये राहत असलेल्या ४७ वर्षीय महिलेचे सोमवारी सकाळी ६.४५ वाजता मडगावच्या कोविड रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर, सकाळी ११.३० वाजता वास्कोतीलच ६० वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाचे निधन झाले आहे. चिखली येथील उप विभागीय रुग्णालयातून आणखी एका रुग्णाला मडगावच्या कोविड रुग्णालयात सोमवारी आणले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे, गोव्यातील सोमवारी दूपारपर्यंत कोरोनाचे १७ बळी झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वाचा : विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प, १० विधेयके मंजुरीचा सरकारचा मानस

मांगोरहिले येथील सदर महिला ही कॅन्सरची रुग्ण असून तिला ६ जुलै रोजी कोविड इस्पितळातील ‘आयसीयू’ विभागात दाखल करण्यात आले होते. तर, सोमवारी वास्कोतील आणखी एका रुग्णाचा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. त्या रुग्णाला  ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याला गेल्या आठवड्यात ८ जुलै रोजी भरती करण्यात आले होते. चिखली येथून कोविड रुग्णालयात आणलेल्या इसमाच्या चाचणी अहवालात तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे, सदर इसम गोव्यातील कोरोनाचा १७ वा बळी ठरला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गोव्यात शनिवारी तीन आणि रविवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. शनिवारी, रुमडावाडा - वास्को येथील ७८ वर्षीय महिला, ८१ वर्षीय वृद्ध हा दुसरा आणि बायणा येथील ३१ वर्षीय युवक हा तिसरा बळी ठरला होता. यानंतर, रविवारी काणकोण येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा आणि चिखली येथील ८० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला होता. यानंतर, सोमवारी तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली असून ती सध्या ९५० झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा :गोव्यात कोरोनाचे आणखी दोन बळी