पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. वैयक्तिक आणि पक्षीय स्तरावर टीका करणार्या विरोधकांना ते चांगलेच फैलावर घेत आहेत. टीकेला ते देखील जाहीर प्रत्युत्तर देऊन टोला लगावत आहेत.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तोफ डागली. ‘यापूर्वी ज्यांनी गोवा विकायला काढला होता त्यांनी मला गोवा कसा स्वयंपूर्ण करायचा, हे शिकवायची गरज नाही’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना फटकारले आहे.
गोवा स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. भाजपचीही राज्यात वाढ होत आहे. ते काहीजणांना पहावत नाही. त्यामुळे ते टीका करताहेत. सध्या जे टीका करत आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर घरी बसावे लागणार आहे, असा टोलाही त्यांनी सरदेसाई यांना लगावला आहे.
जनमत कौलाच्या दिवशी कोविड लसीकरणाचा कार्यक्रम होता. जनमताच्या कौलाच्या दिवशीच सायंकाळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) सोहळा होता. त्यामुळे सरकारी पातळीवर जनमत कौलाचा कार्यक्रम करणे शक्य झाले नाही. पुढील वर्षी शासकीय स्तरावर हा कार्यक्रम केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी जनमत कौलाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना लक्ष केले होते. जनमत कौलामुळे गोव्याचे वेगळे अस्तित्व टिकून राहिले. असा दिवस साजरा करायला सरकारला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली होती. म्हादई नदीचे पाणी वळविण्यास कर्नाटकला परवानी देणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साजरी करण्यात मुख्यमंत्र्यांनी धन्यता मानली. या मुख्यमंत्र्यांनी कृतीतूनच आपण गोव्याच्या विरोधात असल्याचे सिद्ध केल्याचे सरदेसाई म्हणाले होते.
सरदेसाई यांनी यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर ते गोवेकर नसल्याची टीका केली होती. मुख्यमंत्री सावंतवाडीचे असल्याचे ते बोलले होते. मागील वर्षी दोडामार्ग (जि. सिंधुदूर्ग) मधील लोकांनी गोव्यात विलीनीकरणाची मागणी केली होती. याबाबत त्यांचा (मुख्यमंत्री सावंत) भूमिपुत्र मुख्यमंत्री झाल्यामुळे ही मागणी केली होती, असा जावईशोध सरदेसाई यांनी लावला होता. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचा काही भाग गोव्यात समाविष्ट करून गोवेकरांना अल्पसंख्यांक करण्याचे कारस्थान मुख्यमंत्री रचत असल्याचे सांगत सरदेसाई यांनी सावंत यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता.
भाजपच्या यशामुळे सरदेसाईंना पोटशूळ : तानावडे
भाजप जनमत कौलदिन पाळत होता. पण सध्या कोरोनाचा काळ असल्याने कार्यक्रम आयोजन टाळले. गर्दी टाळण्याचा आणि कोरोना संसर्ग टाळण्याचाच यामागे हेतू होता, असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आमदार विजय सरदेसाईंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भाजपला कुठल्याच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दिवसाचा विसर पडलेला नाही. नुकत्याच झालेल्या जि. पंचायत निवडणुकीतील यशामुळे सरदेसाईंना पोटशूळ उठल्याने ते नाहक सरकारवर टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.