पणजी : प्रतिनिधी
राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प मौलिकदृष्ट्या पालटलेल्या स्वरूपात सादर करणार असून लोकप्रिय योजनांऐवजी समाजाच्या उन्नतीसाठी मूलभूत बदलाच्या संकल्पना मांडण्यावर व राबवण्यावर भर असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील मराठी दैनिकांच्या संपादकांशी केलेल्या अनौपचारिक संवादावेळी सांगितले.
नकारात्मक बाबींना फाटा देऊन पूर्णत: सकारात्मक दृष्टीने विविध विषय, प्रश्नांसदर्भात योजना, उपाय, संकल्पनांची चर्चा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करणार असून यंदा फेब्रुवारीतच अर्थसंकल्प सादर करून मंजूर केला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दरवर्षी अर्थसंकल्प, त्यावरील चर्चा, मंजुरी उशिरा होत असल्याने कार्यवाहीसाठी अवधी कमी मिळतो. अर्थसंकल्प लवकर मंजूर केल्यामुळे पूर्ण अवधी हाताशी राहणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार, 90 ते 93 टक्केपर्यंत खर्चाचा पल्ला गाठणे शक्य होईल.
राज्याच्या महसुलात जीएसटीमुळे 6 ते 8 टक्के वाढ झाली आहे. अबकारी करात 19 टक्के, वाहतूक खात्याच्या करात 23 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कॅसिनोत कुणाही गोमंतकीयाला जाता येणार नाही, अशी तरतूद करणार आहे. जे नोकरीसाठी जातात त्यांचा अपवाद असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात आणखी चार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची योजना आहे. सध्याच्या प्रकल्पात कचरा विल्हेवाटीसाठी येणारा प्रती टन 1300 रुपयांचा खर्च कसा कमी करता येईल याचाही विचार केलेला आहे, असे सांगून पर्रीकर म्हणाले की, सर्वसामान्य लोकांकडून निर्माण होणार्या कचर्याच्या पाचपट कचरा पंचतारांकित हॉटेल्समधून निर्माण होतो. कचरा विल्हेवाटीसंदर्भात या हॉटेल्सना काही दंडक लावायचा विचार आहे.
सर्व स्थानिकांना रोजगार देणे सरकारला शक्य नाही. स्थानिकांना रोजगार देणार्या उद्योगांमध्ये खर्चापोटी गुंतवणूक करण्यास सरकारची तयारी आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छता अभियान वेगळ्या उंचीवर न्यायचे आहे. राज्यातील प्रत्येक हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स डिप्सेन्शन युनिट पुढील वर्षापासून कार्यरत करण्याची योजना आहे. समाजात श्रमप्रतिष्ठेची संकल्पना रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे सांगून ते म्हणाले, सफाई कामगारांनादेखील सन्मानित केले पाहिजे.
राज्यातील सडक अपघात व त्यात बळी जाणार्यांची संख्या चिंताजनक आहे. दरवर्षी किमान हजारभर कुटुंबांना अपघाताची झळ बसते. अपघातांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी केले जाणार आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.