होमपेज › Goa › बँक दरोड्याचा सूत्रधार गजाआड

बँक दरोड्याचा सूत्रधार गजाआड

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:22PM

बुकमार्क करा

म्हापसा/बार्देश : प्रतिनिधी  

इंडियन ओवरसीज बँकेच्या वेर्ला काणका शाखेत शुक्रवार दि. 8 रोजी पडलेल्या दरोड्यातील मुख्य सूत्रधार राजकुमार उर्फ राजू दास यास म्हापसा पोलिसांनी रविवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास बांबोळी येथे अटक केली. राजू दास हा पर्वरी येथील एका फास्टफुड सेंटरचा मालक आहे. 

संशयित दास हा प्रवासी बसने बांबोळीत कुणालातरी भेटण्यासाठी जात असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस पथक बांबोळी येथे दाखल झाले. पोलिसांनी मडगावहून पणजीकडे येणारी प्रवासी बस बांबोळी येथे मैदानाजवळ थांबविली व बसमध्ये असलेल्या राजकुमार उर्फ राजू दास याला अटक केली. म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर, त्यांचे सहकारी शिपाई रूपेश कोरगावकर, राजेश कांदोळकर, इर्शाद वाटंगी व सुनिल रेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयित राजकुमार उर्फ राजू दास व पोलिस कोठडीत असलेल्या हिरा दास या दोघांना सोमवार दि.11  रोजी   न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हिरा दास सध्या पोलिस कोठडीत असून त्याची पोलिस कोठडी सोमवारी संपते. तर संशयित विजयकुमार दास सध्या येथील जिल्हा इस्पितळात उपचार घेत आहे.

या दरोड्यातील इतर चार संशयित   अद्यापही फरारी असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस पथके पाठविली आहेत. या दरोड्याचा तपास लावण्यासाठी पोलिस रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.

या दरोड्यातील मुख्य सूत्रधार सापडल्याने पोलिस तपासाला गती आली आहे. मुख्य सूत्रधार असलेल्या संशयिताच्या जबानीनंतर दरोड्याचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.