Tue, Jun 15, 2021 11:47
जादुई आकड्यासाठी भाजपची कसरत

Last Updated: Jun 14 2021 2:38AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गत विधानसभा निवडणुकीत मनोहर पर्रीकर यांना गोव्यात भाजप अल्पमतात असल्याने सत्ता स्थापनेसाठी कसरत करावी लागली होती. त्यानंतरही काँग्रेसच्या  आमदारांना घेऊन पक्षीय बलाबल वाढवावे लागले आहे, हे वास्तव लक्षात घेता पुन्हा अशी कसरत करावी लागू नये; अन्यथा हे सरकारला अवघड जागेचे दुखणे बनू शकते.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेचा सोपान गाठायचा झाल्यास स्वबळावर सत्ता खेचावी लागणार आहे, यासाठी प्रदेश भाजपची केंद्रीय नेत्यांसमवेतच्या बैठकांतून कसरत सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका होणार हे निश्चित आहे. सध्या भाजपमध्ये अनेक असंतुष्ट आमदार आहेत आणि मंत्र्यांतही वाद आहे. यातील काहीजणांचे वाद केंद्रीय नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेतृत्व कमी पडतेय, ही भावना केंद्रीय नेत्यांमध्ये असल्याने सध्या गोव्यावर दिल्लीचे लक्ष असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळेच केंद्रीय महासचिव बी. एल. संतोष आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांना गोव्यात येऊन भाजपच्या मंत्री, आमदार, पक्षीय पदाधिकारी आणि कोअर कमिटीसमवेत बैठक घ्यावी लागली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या.

मनोहर पर्रीकर यांच्या काळात 2017 मधील निवडणुकीत 13 आमदार असतानाही पर्रीकरांना केंद्रातून परतून गोव्यात मुख्यमंत्री व्हावे लागले होते. त्यामागे इतर प्रादेशिक पक्षांचे आणि अपक्ष आमदारांची मागणी असल्याची सबब सांगण्यात येत होती. हे सर्व सत्तेसाठी एकत्रित आले होते, हे लपून राहिले नाही. 17 आमदार असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यावेळी  संख्याबळ कमी असतानाही भाजपने राजकीय डावपेच टाकले होते. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली घटक पक्षांच्या व अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याच्या कुबड्या हटविण्यात आल्या आणि काँग्रेसच्या  दहा आमदारांना घाऊक रूपात पक्षात घेत पक्षाचे संख्याबळ 27 वर नेऊन ठेवण्यात आले. यासाठी ज्या काही वाटाघाटी कराव्या लागल्या होत्या, त्या पुढील काळात पक्षाला अडचणीच्या ठरू शकतात. त्यातूनच बी. एल. संतोष व सी. टी. रवी यांनी आमदारांना जो काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र दिला आहे, त्यातून पक्षाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे, हे निश्चित.

निवडून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी द्या : मायकल लोबो

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यालाच उमेदवारी द्यावी, असे आपण स्पष्टपणे संघटन मंत्री बी. एल. संतोष व सी. टी. रवी यांच्यासमोर सांगितले. त्यासाठी आपण कोणत्याही आमदाराचे उदाहरण न देता स्वतःचे उदाहरण दिल्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गुरुवारी झालेल्या बैठकीत निरीक्षकांसमोर मते मांडली आहेत. बार्देश तालुक्यात भाजपचे संघटनात्मक काम महत्त्वाचे आहे. मतदारसंघात कशा पद्धतीने काम सुरू आहे, शेजारील मतदारसंघात कसे काम चालले आहे, याचा सर्व आढावा आपण या चर्चेत सांगितला आहे. क सलीही जबाबदारी अद्याप दिलेली नाही. परंतु पक्ष बांधणीचे कार्य,  तसेच अधिकाधिक आमदार कसे निवडून येतील, याकडे लक्ष द्यावे, असे निरीक्षकांनी सूचित केल्याचे ते म्हणाले.

लोबो म्हणाले की, गेल्या वर्षी 13 उमेदवार निवडून आले. मागील निवडणुकीत काही नेते मंत्री असतानाही पडले, हेही पक्षाने पाहिले पाहिजे. कारण विजयाची  क्षमता असणे महत्त्वाचे आहे. जे आपणास काही दिसते, ते आपण त्यांच्यासमोर पूर्णपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सी. टी. रवी यांना आपली काय भूमिका आहे, ते स्पष्ट केली आहे आणि त्यांना ती समजलेली आहे. त्याशिवाय पुन्हा एकदा सर्वांची एकास एक बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक होईल, असेही त्यांनी नेतृत्वबदलाच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. ज्या मतदारसंघात भाजप कमकुवत आहे, याविषयी पुन्हा एकदा आपणास बोलावून घेऊ, असे सांगितले आहे.

मंत्री म्हणाले...

राज्यातील काय समस्या आहेत,  तसेच 2020 व 2021 या कोरोना काळात भाजपने केलेल्या कामाचा बी. एल. संतोष यांनी आढावा घेतल्याचे वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर म्हणाले की, 2022 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना बरोबर घेऊन चला, असे निरीक्षकांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी संतोष व रवी यांची भेट घेतली, परंतु पत्रकारांना काहीही न सांगता त्यांनी तेथून काढता पाय  घेतला.