Tue, Jun 15, 2021 11:31
विधानसभा निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली!

Last Updated: Jun 14 2021 2:38AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आगामी 2022 ची पंचवार्षिक विधानसभा निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली होईल, असे आत्मविश्वासाने सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याचा पुनरुच्चार केला. यापूर्वीच पक्षाच्या नेतृत्वानेही हा निर्णय अगोदरच जाहीर केला आहे, असे सांगत पुढील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची वाटचाल कशी राहील, हे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय संघटन मंत्री तसेच महासचिव बी. एल. संतोष व गोवा प्रभारी सी. टी. रवी गोव्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

सरकारी निवासस्थानी बी. एल. संतोष व सी. टी. रवी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संतोष व रवी या नेत्यांचा दोन दिवस गोव्यात दौरा होता, त्यात त्यांनी पक्षाचे मंत्री व आमदारांशी, पक्षाचे पदाधिकार्‍यांशी एकास एक चर्चा केली आहे. सरकारचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नाही. निवडणुकीचा कार्यक्रम म्हणून ते गोव्यात आले आहेत.

राज्यातील पक्षीय संघटनेविषयी विविध विषयांवर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामगिरीविषयी या बैठकीत चर्चा झाली नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विषय पुढे आले. मंत्री म्हणून गोविंद गावडे आलेल्या नेत्यांना भेटले आहेत. ते भाजपात आले तर त्यांना घेणार काय, या प्रश्नावर तो निर्णय पक्ष घेईल, असेही सावंत यांनी सांगितले.