Sat, Jul 11, 2020 09:15होमपेज › Goa › फातर्प्यात ९ जण कोरोनाबाधित

फातर्प्यात ९ जण कोरोनाबाधित

Last Updated: Jul 01 2020 8:04AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

आंबेली येथे विवाह सोहळ्यात स्वयंपाक बनवण्यासाठी गेलेल्या आणि तेथून कोरोनाची लागण होऊन आलेल्या  फातर्प्याच्या दोन महिलांनी फातर्पा भागात एका अंत्यसंस्काराला  उपस्थिती लावल्यानंतर नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे फातर्पा पंचायत क्षेत्रात खळबळ माजली आहे. या भागातील एकूण 94 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. फातर्पाचे उपसरपंच सेंजिल डिकॉस्टा यांनी ताबडतोब फातर्पा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

चिंचोणे मतदारसंघातील आंबेली आणि कुंकळ्ळी मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्या नंतर  सोमवारपासून फातर्पा भाग सील करण्यात आला होता. शनिवारी आंबेली येथे गेलेल्या दोन महिला कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी नऊ जणांची भर पडली आहे. बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता काकोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार  दोन महिला काही दिवसांपूर्वी आंबेली येथे विवाह समारंभात गेल्या होत्या.आंबेली भागात कोरोनाच्या प्रादुर्भाव बराच वाढला असून त्याठिकाणी मोठया प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्या दोन्हीं महिलांची चाचणी केली असता दोन्ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.त्या दोन्ही महिलांची चौकशी केली असता विवाह समारंभानंतर त्या महिलां फातर्पा येथे एका अंत्य संस्कारासाठी गेल्या होत्या, असे  समोर आले. त्यानंतर त्या परिसरातील एकूण 94 जणांची चाचणी करण्यात आली आणि त्यात नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले.डॉ ममता यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या फातर्पा भागात एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या अकरा झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार या नऊ जणांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. एकजण कुंकळ्ळी पालिकेचा कामगार आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले काही जण गेल्या दोन दिवसांपासून मोटरसायकलवरून विविध भागात फिरत होते.कोरोना ग्रस्त लोकांनी कुंकळ्ळी सह बाळळी भागात सुध्दा कामांच्या निमित्ताने प्रवास केला होता, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग इतर भागातही पसरला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

कोरोनाची लागण झालेल्या सर्व अकरा व्यक्ती आदिवासी ख्रिश्चन समाजातील आहेत. रोजंदारीवर काम करणारे हे लोक त्यांचा अहवाल येण्यापूर्वी रिक्षात बसून शेतात रोपणी करण्यासाठीसुद्धा गेले होते. यावेळी ते कोण कोणाला भेटले, याची चौकशी केली जात आहे. उपसरपंच सेंजिल यांनी दै.‘पुढारी’शी  बोलताना सांगितले, की फातर्पा परिसर कंटेन्मेंट झोन करावा, अशी आपण सरकारकडे मागणी केली आहे.