Tue, Sep 22, 2020 07:47होमपेज › Goa › पावसाळी पर्यटकांत ६० टक्के वाढ 

पावसाळी पर्यटकांत ६० टक्के वाढ 

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 22 2018 11:55PMपणजी : प्रतिनिधी

उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. 2017 मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत पर्यटकांची 60 टक्के वाढ दिसून आली. यामुळे गोवा हे आता 365 दिवस पर्यटनाचे केंद्र बनले आहे,असे पर्यटन खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

मान्सून फेस्टिव्हल म्हणून पावसाळ्यात खास उपक्रम राबवले जातात तसेच पर्यटकांना स्पेशल पॅकेज दिले जाते. धबधबे, झरे, तलाव हेही पर्यटकांचे आकर्षण बनलेले असते. मान्सूनमध्ये दुधसागर धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करीत असतात.गोव्याचा पर्यटक मोसम ऑक्टोबरमध्ये सुरु होतो. परंतु अलीकडच्या काळात सप्टेंबरमध्येच पर्यटक दाखल होतात. ‘गोवा365 दिवस पर्यटना’ची जाहिरात देश विदेशात सर्व ठिकाणी केली जात असल्याने  त्याचा चांगला परिणामही दिसून आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पर्यटन खात्याने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर-2017 या कालावधीत पर्यटकांच्या संख्येत त्याआधी सालच्या तुलनेत वाढ झाली आहे. गोव्यात जून ते सप्टेंबर-2017 या कालावधीत 19 लाख 15 हजार पर्यटक  आले. यामध्ये  18 लाख 55 हजार देशी पाहुण्यांनी उपस्थिती लागली होती. 

त्या आधीच्या वर्षात 2016 मध्ये याच कालावधीत 11 लाख 93 हजार पर्यटक आले होते. यामध्ये देशी  पर्यटकांची संख्या 11 लाख 48 हजार इतकी होती.  राज्यात  विदेशी पर्यटकही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. गेल्या वर्षी मान्सूनमध्ये 60 हजार 161 विदेशी पर्यटक आले तर 2016 मध्ये याच कालावधीत विदेशी पाहुण्यांची संख्या 45 हजार 437 होती. 

मागील 2016सालच्या तुलनेत 2017 च्या जून महिन्यात 30.75 टक्यांनी पर्यटक वाढले. जुलैमध्ये 61.44 टक्क्यांनी, ऑगस्टमध्ये 71.39 टक्क्यांनी तर सप्टेंबरमध्ये 94.55 टक्क्यांनी पर्यटकसंख्या वाढल्याचेही ही आकडेवारी सांगते. 

Tags : goa, goa news, 60 Percent, increase, rainy tourist,