पणजी : पुढारी वृत्तसेवा
आफ्रिकेत जहाजावर अडकून पडलेले 79 खलाशी जोहनसबर्ग येथून दक्षिण आफ्रिकन एअरलाईन्सने शुक्रवारी दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यापैकी 46 खलाशी गोव्याचे आहेत. गोव्याच्या सर्व खलाशांना कदंब परिवहन महामंडळाच्या वॉल्वो बसने शनिवारी गोव्यात आणण्यात येणार आहे, असे गोवा सी-फेरर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी सांगितले.
गोव्याचे सर्व 46 खलाशी एमएससी ऑर्केष्ट्रा क्रुझ या जहाजावर काम करीत होते. ते सर्वजण कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे दर्बान येथे अडकून पडले होते. गेले 50 दिवस त्यांचे एका हॉटेलात वास्तव्य होते. दक्षिण आफ्रिकन एअरलाईन्सच्या खास विमानाने त्यांना भारतात पाठविले आहे. गोव्यात पोहचल्यानंतर सर्व खलाशांची कोविड 19ची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वांना 14 दिवसपर्यंत होम क्वारंटाईन करून ठेवले जाणार आहे, असे वाझ यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतून खास विमानाने मुंबईत पोहचलेल्या गोव्याच्या खलाशांना गोव्यात आणण्यासाठी कदंब परिवहन महामंडळाचे चेअरमेन कार्लुस आल्मेदा यांनी कदंबच्या खास दोन वॉल्वो बसेस मुंबईला पाठविल्या आहेत, असेही वाझ यांनी सांगितले.