Wed, Aug 12, 2020 03:53होमपेज › Goa › मद्यपींच्या हल्ल्यात ४ पोलिस जखमी

मद्यपींच्या हल्ल्यात ४ पोलिस जखमी

Last Updated: Jan 15 2020 1:43AM
मडगाव : प्रतिनिधी
देमानी येथे दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या युवकांच्या टोळीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुंकळळी पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर मद्यधुंद युवकांनी हल्ला करून 4 पोलिसांना जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. युवकांनी पोलिसांच्या दोन वाहनांची मोडतोड केली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पाच जणांनी घटनास्थळावरून पोबारा केल्याने त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.महामार्ग पेट्रोलिंग नऊचे संजय गावकर आणि आकाश गावकर तसेच रॉबर्ट 59 वरील प्रमोद कोठारकर आणि महेश नाईक अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

पोलिस ठाण्यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणातील मयूर देसाई आणि अब्दुल रजाक या दोघाजणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. संदीप देसाई, संतोष नाईक, शुभम बोरकर, साईश देसाई आणि स्वप्नेश देसाई हे युवक पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला. देमानी येथील कोंब्याचो खुरीस या ठिकाणी काही युवकांचा गट दारू पिऊन दंगामस्ती करत असल्याची माहिती देणारा कॉल कुंकळ्ळी पोलिसांना आला होता.त्यानुसार कुंकळ्ळी पोलिसांची रॉबर्ट व्हॅन त्याठिकाणी पाठवण्यात आली. सदर परिसर महामार्गाला लागून असल्याने शिवाय पहाटे अंधार असल्याने पोलिसांनी महामार्गावर ड्युटी करणार्‍या पेट्रोलिंगच्या गाडीला संदेश पाठवून त्यांनासुद्धा बोलावून घेतले होते. पोलिस घटनास्थळी गेले असता सुमारे सात ते नऊ जणांच्या युवकांचा गट त्याठिकाणी दारू पीत असल्याचे त्यांना आढळून आले.त्या युवकांना पोलिसांनी हटकले असता त्या युवकांनी पोलिसांना तेथून जाण्यास सांगितले. पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या युवकांनी त्यांच्यावर दारूच्या बाटल्या, दांडे तसेच झावळ्यांच्या दांडक्यांनी हल्ला चढवला. दारूच्या नशेत असलेल्या युवकांनी एवढ्यावर न थांबता पोलिसांच्या दोन्ही वाहनांची मोडतोड केली. दांडे आणि दगड फेकून मारल्याने एका पोलिस वाहनाच्या दर्शनी भागाची काच आणि दुसर्‍या वाहनाची बाजूची काच फुटली. 

कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक थेरन डिसौजा यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या सर्व पोलिसांना बाळळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आले होते.दुपारी त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

मद्यपींची दादागिरी खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री
राज्यात सर्वत्र उघड्यावर बसून मद्यप्राशन करण्यास शासनाने बंदी घातली आहे, तरी मद्यपींचे रात्री-अपरात्री उघड्यावर बसून मद्यप्राशन करण्याचे प्रकार चालूच आहेत, ही खेदाची बाब आहे. सरकार मद्यपींची दादागिरी कदापिही खपवून घेणार नाही,असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सैन्य दल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देमानी-कुंकळ्ळी येथे सोमवारच्या मध्यरात्री मद्याच्या नशेत काही तरुणांनी गस्तीवरील पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला. यासारखे प्रकार रोखण्यासाठी सरकारने पोलिसांना पूर्ण अधिकार दिले आहेत. पोलिसांना करण्यात आलेल्या मारहाणीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. 5 फरारी तरुणांची माहिती मिळालेली असून त्यांना अटक करण्यात येईल. मद्याच्या नशेत पोलिसांवर हल्ला करणार्‍या या तरुणांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.