Sun, Jan 17, 2021 06:00
अर्थवार्ता

Last Updated: Dec 28 2020 12:37AM
प्रीतम मांडके

गतसप्‍ताहात निफ्टी निर्देशांकाने एकूण 11.30 अंकांची घट दर्शवून 13749.25 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टीमध्ये एकूण 0.08 टक्क्यांनी घट झाली. तसेच दुसरा निर्देशांक सेन्सेक्सने एकूण 12.85 अंकांची वाढ दर्शवून 46973.54 अंकांच्या पातळवीर बंदभाव दिला. सेन्सेक्समध्ये एकूण 0.03 टक्क्यांची वाढ झाली.

रिझर्व्ह बँकेचे नियमाबाहेर जाऊन काम करणार्‍या सहकारी बँकांवर कारवाईचे कडक पाऊल. आधी सातारा जिल्ह्यातील कराड जनता सहकारी बँकेचे तर सप्‍ताहाअखेर कोल्हापूरच्या सुभ्रदा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला. 24 डिसेंबर 2020 रोजीपासून ‘सुभद्रा’ लोकल एरिया बँकेचे कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

डिजिटल मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नियमबाह्य कर्ज देणार्‍या खासगी अ‍ॅपच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आदेश बँकेने देशातील नागरिकांना दिले. ‘केवायसी’ कागदपत्रे अनोळखी व्यक्‍ती तसेच अ‍ॅपसोबत शेअर करू नयेत. फसवणूक झाल्याने 3 व्यक्‍तींनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले तर याप्रकरणी दिल्ली, गुरुग्राम या ठिकाणांहून एकूण 17 जणांना अटक करण्यात आली. 

आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रुळावर येण्याचे रिझर्व्ह बँकेचे संकेत. पहिल्या तिमाहीत तब्बल 23.9 टक्के घट तसेच दुसर्‍या तिमाहीत 7.5 टक्क्यांची घट दर्शवल्यानंतर तिसर्‍या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर 0.1 टक्क्यांपर्यंत वधारण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात प्रतिपादन करण्यात आले.

पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी करणार्‍या भारत सरकारला आंतराष्ट्रीय न्यायालयाकडून धक्का. याप्रकरणी ब्रिटनची कंपनी केर्न एनर्जी पीएससीला भारत सरकारने 1.4 अब्ज डॉलर्स (सुमारे 10 हजार 300 कोटी) परत द्यावे, असा निकाल आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने दिला. यापूर्वी 2006-07  सालामधील व्यवहारावर 10247 कोटींची करवसुली या कंपनीकडून करण्यात आली होती.

केर्न प्रमाणेच ब्रिटिश दूरसंचार कंपनी ‘व्होडाफोन ग्रुप पीएलसी’ची बाजू वैध ठरवणारा तसेच भारत सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने दंडापोटी 22,100 कोटींची रक्‍कम मागणारी कृती अवैध ठरवणारा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. या निकालाविरुद्ध भारत सरकारने 90 दिवसांची मुदत संपण्याआधी सिंगापूरस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली, परंतु सरकार आणि व्होडाफोन दोन्ही बाजूंकडून याविषयी मौन पाळण्यात आले.

वर्षाअखेर ‘ऑक्टोबर ते डिसेंबर’ महिन्यांच्या तिमाहीत घरखरेदी व्यवहारात भरघोस वाढ. मागील तिमाहींच्या तुलनेत अखेरच्या तिमाहीत एकूण महत्त्वाच्या 7 शहरांमध्ये सरासरी तब्बल 51 टक्क्यांची वाढ. सर्वाधिक वाढ पुण्यात म्हणजेच सुमारे 147 टक्क्यांची वाढ. तसेच मुंबईमध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली.

दिवाळखोर ‘डीएचएफएल’ कंपनी कोणाकडे सोपवली जाणार याचा निकाल 15 जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता. यासंबंधीचा निर्णय रोखेधारक, गुंतवणूकदार तसेच ‘डीएचएफएल’ कंपनीला कर्ज दिलेल्या संस्था एकत्रितपणे घेणार. या कंपनीच्या खरेदीसाठी एकूण 5 खरेदीदार कंपन्या उत्सुक. यामध्ये ओकट्री, पिरामल उद्योगसमूह तसेच अदानी उद्योगसमूह यांच्यामध्ये काट्याची टक्‍कर.

महिंद्रा अँड महिद्रा उद्योगाची दक्षिण कोरियातील उपकंपनी ‘सँगयाँग’ मोटर कंपनीने आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली. 

24 डिसेंबरअखेर आर्थिक वर्ष 2019-20 साठी इन्कमटॅक्स रिटर्न भरणार्‍यांची संख्या 3.97 कोटींवर पोहोचली. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर निश्‍चित करण्यात आली आहे.

भारताची परकीय गंगाजळी पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचली. 18 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 2.563 अब्जांनी वधारून 581.131 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.